Yamuna Expressway Accident
Yamuna Expressway AccidentYamuna Expressway Accident

Yamuna Expressway Accident : मथुरा जवळ यमुना द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; 13 ठार, 25 हून अधिक जखमी

उत्तर प्रदेशातील मथुरा शहराजवळ आज पहाटे यमुना द्रुतगती मार्गावर एक अतिशय गंभीर अपघात झाला. या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला असून 25 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत.
Published by :
Riddhi Vanne
Published on

(Yamuna Expressway Accident) उत्तर प्रदेशातील मथुरा शहराजवळ आज पहाटे यमुना द्रुतगती मार्गावर एक अतिशय गंभीर अपघात झाला. या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला असून 25 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. पहाटेच्या वेळी दाट धुके असल्याने रस्त्यावर स्पष्ट दिसत नव्हते आणि त्यामुळे आग्रा ते नोएडाकडे जाणाऱ्या 8 बसेस आणि 3 कार एकमेकांवर आपटल्या. धडक इतकी तीव्र होती की काही वाहनांना आग लागली.

ही घटना आग्रा–नोएडा महामार्गावर बलदेव पोलीस ठाण्याच्या परिसरात खडेहरा गावाजवळ, १२७ व्या किलोमीटरजवळ घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि प्रशासनाचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. बचाव कार्य वेगाने सुरू करण्यात आले. जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णवाहिकांमधून जवळच्या दवाखान्यात नेण्यात आले आहे. मृत व्यक्तींचे मृतदेह तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, उरलेल्या प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थळी पोहोचवण्यासाठी प्रशासनाने दुसरी वाहने उपलब्ध करून दिली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार

अपघात प्रत्यक्ष पाहिलेल्या लोकांनी सांगितले की धुके इतके जाड होते की रस्त्यावर काहीच दिसत नव्हते. अचानक एकामागून एक वाहनं धडकली आणि काही मिनिटांतच काही वाहनांना आग लागली. अनेक प्रवासी वाहनांत अडकले, तर काही जणांनी प्रसंग ओळखून बसमधून उडी मारून स्वतःचा जीव वाचवला. मात्र काही प्रवासी बाहेर पडू शकले नाहीत आणि त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. कानपूर येथील सौरभ नावाच्या प्रवाशाने सांगितले की, “समोर काहीच दिसत नव्हतं. अचानक मोठा आवाज झाला आणि बस एकमेकांवर आदळल्या. थोड्याच वेळात आग लागली.”

प्रशासनाची प्रतिक्रिया

मथुराचे जिल्हाधिकारी चंद्रप्रकाश सिंह यांनी या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. वाहनांच्या जोरदार धडकेनंतर आग लागल्याने मोठी जीवितहानी झाल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री यांनी या घटनेची गंभीर दखल घेत जखमींवर तातडीने उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अपघातामुळे काही काळ यमुना द्रुतगती मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती, मात्र बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर हळूहळू वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com