Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप
अखेर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित विजयी मेळावा आज, 5 जुलै रोजी वरळी डोम येथे सकाळी 11 वाजता पार पडणार आहे. या निमित्ताने हजारोंच्या संख्येने मनसैनिक आणि शिवसैनिक राज्यभरातून येत मुंबईत दाखल होणार आहेत. राज्यात हिंदी भाषा सक्तीविरोधातील मनसेची मोहिम यशस्वी झाल्यानंतर मनसे आणि शिवसेनेने हा आनंद साजरा करण्यासाठी विजयी मेळाव्याचे आयोजन केले. त्यांच्या या मोहिमेला राज्यातील इतर पक्षांनीही पाठिंबा दर्शवला असून उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसह शरद पवार यांची राष्ट्रवादी, प्रहार संघटनेने बच्चू कडू यांसारख्या पक्षांनाही या मेळाव्याला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आजच्या कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसोबत इतर पक्षाचे नेतेही भाषणं करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विजयी मेळाव्यात प्रकाश रेड्डी, जयंत पाटील (शेतकरी पक्ष), सुप्रिया सुळे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे अशी भाषणं होतील. जर काँग्रेसचे नेते आले तर त्यांना देखील भाषण करण्याची संधी मिळणार आहे. शेवटचं भाषण उद्धव ठाकरे यांचं होईल. डोमच्या बाहेर हाजी अली, वरळीला जाणारे दोन्ही रस्ते पॅक होतील. तिथे स्क्रीन लावली जाणार आहे. तर दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी बंद केले जाण्याची शक्यता आहे.