RuleChange  : १ फेब्रुवारीपासून बदलणार ५ मोठे नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम

RuleChange : १ फेब्रुवारीपासून बदलणार ५ मोठे नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम

फेब्रुवारी महिन्याची सुरुवात आणि त्याच दिवशी सादर होणारा २०२६ चा केंद्रीय अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी अनेक बदल घेऊन येणार आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

फेब्रुवारी महिन्याची सुरुवात आणि त्याच दिवशी सादर होणारा २०२६ चा केंद्रीय अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी अनेक बदल घेऊन येणार आहे. स्वयंपाकाच्या गॅसपासून ते विमान प्रवास, तंबाखूजन्य पदार्थ, वाहनचालक आणि बँकिंग व्यवहारांपर्यंत किमान पाच महत्त्वाचे नियम १ फेब्रुवारी २०२६ पासून बदलणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम घरगुती बजेट आणि दैनंदिन खर्चावर होणार आहे.

एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल विपणन कंपन्या एलपीजी सिलिंडरचे दर सुधारतात. १ फेब्रुवारी रोजी घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती जाहीर केल्या जाणार आहेत. बजेटच्या पार्श्वभूमीवर १४ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात होईल, अशी सर्वसामान्यांना अपेक्षा आहे. याआधी १ जानेवारीला १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ₹१४.५० ची कपात करण्यात आली होती.

एटीएफ, सीएनजी आणि पीएनजी दरांचा परिणाम

१ फेब्रुवारीपासून एअर टर्बाइन फ्युएल (ATF) चे नवे दर लागू होतील. एटीएफच्या किमतीत बदल झाल्यास विमान तिकीट महाग किंवा स्वस्त होऊ शकते. मागील महिन्यात एटीएफचे दर सुमारे ७ टक्क्यांनी कमी झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला होता. याशिवाय सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीतही सुधारणा होण्याची शक्यता असून याचा परिणाम वाहतूक आणि घरगुती गॅस खर्चावर होईल.

पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थ महागणार

सरकारने तंबाखूजन्य पदार्थ आणि पान मसाल्यावर कर रचनेत मोठा बदल केला आहे. १ फेब्रुवारीपासून जीएसटी व्यतिरिक्त उत्पादन शुल्क आणि आरोग्य व राष्ट्रीय सुरक्षा उपकर (सेस) आकारला जाणार आहे. त्यामुळे सिगारेट, पान मसाला आणि तत्सम उत्पादनांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

फास्टॅग नियमांत सुलभता

वाहनधारकांसाठी दिलासादायक निर्णय घेत एनएचएआयने फास्टॅगसाठी केवायसी पडताळणी प्रक्रिया रद्द केली आहे. १ फेब्रुवारी २०२६ पासून कार, जीप आणि व्हॅनसाठी नवीन फास्टॅग घेणे अधिक सोपे होणार आहे.

फेब्रुवारीतील बँक सुट्ट्या

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या यादीनुसार फेब्रुवारी महिन्यात बँका एकूण १० दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी महत्त्वाची बँकिंग कामे आधीच नियोजित करावीत किंवा डिजिटल बँकिंगचा वापर करावा, असा सल्ला देण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com