Maharashtra Cabinet Reshuffle : अजित पवारांच्या निधनानंतर मंत्रिमंडळ फेरबदलाची जोरदार चर्चा
बुधवार हा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत धक्कादायक ठरला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजितदादा पवार यांचे भीषण विमान अपघातात निधन झाले आणि संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले. अजितदादांच्या निधनाने निर्माण झालेल्या पोकळीमुळे आता केवळ राष्ट्रवादीच नव्हे, तर संपूर्ण महायुती सरकारपुढे नेतृत्व आणि प्रशासनाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ फेरबदल, महत्त्वाच्या खात्यांचे पुनर्वाटप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याबाबत मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
अजित पवार यांच्याकडे अर्थ विभागासह ऊर्जा आणि नियोजनासारखी महत्त्वाची खाती होती. त्यांच्या निधनानंतर राज्याचा आगामी अर्थसंकल्प कोण सादर करणार, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अर्थ खात्याला नवा चेहरा मिळणार का, तसेच गृह, ऊर्जा यांसारख्या खात्यांमध्येही बदल होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्रीपदासाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा असून, यामुळे या विषयाला आणखी संवेदनशील वळण लागले आहे.
छगन भुजबळ वर्षा निवासस्थानी
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी दाखल झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. या भेटीत मंत्रिमंडळ फेरबदल, राष्ट्रवादीकडील खाती आणि उपमुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार यांच्याकडे असलेली खाती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील इतर मंत्र्यांकडे सोपवण्याबाबत पक्षाकडून मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यात येणार असल्याची माहिती आहे. यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे माध्यमांशी संवाद साधणार आहेत.
मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेत
अजित पवारांच्या निधनानंतर सरकारमध्ये संतुलन राखण्यासाठी मंत्रिमंडळ फेरबदल अपरिहार्य असल्याचे मानले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली खाती कायम ठेवायची की ती इतर पक्षांना द्यायची, यावर महायुतीत चर्चा सुरू आहे. विशेषतः अर्थ, ऊर्जा आणि गृह खात्यांबाबत निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रिकरणावर निर्णय?
या सर्व घडामोडींमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे संभाव्य एकत्रिकरण. सूत्रांच्या माहितीनुसार, पवार कुटुंबीय लवकरच एकत्र बसून यावर अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. अजित पवार हयात असताना दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली होती. शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे, शरद पवार, जयंत पाटील, अमोल कोल्हे, शशिकांत शिंदे हे नेते चर्चेत सहभागी होते. आता अजित पवार नसल्याने पवार कुटुंबीयच या विषयावर निर्णय घेतील, अशी माहिती आहे.
विरोधकांची टीका आणि जनभावना
दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका करत “भाजपला सगळीच खाती हवी आहेत,” असा आरोप केला. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, ही जनभावना असल्याचे सांगितले. “अजितदादांचीही हीच इच्छा होती,” असे त्यांनी स्पष्ट केले. एकूणच अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात शोक, अनिश्चितता आणि सत्तासमीकरणांचा नवा अध्याय सुरू झाला असून, पुढील काही दिवसांत मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे.
