IPL 2026 Auction : आयपीएल 2026 मिनी लिलावात विदेशी खेळाडूंचा दबदबा, ग्रीनवर विक्रमी बोली
(IPL 2026 Auction) आयपीएल 2026 च्या मिनी लिलावात यंदा पुन्हा एकदा विदेशी खेळाडूंनीच बाजी मारली असून, काही भारतीय खेळाडूंनाही मोठा भाव मिळाल्याने लिलाव रंगतदार ठरला. लिलाव सुरू होण्यापूर्वीच कोणते खेळाडू सर्वाधिक रक्कम उचलणार, याबाबत उत्सुकता होती आणि अपेक्षेप्रमाणेच मोठ्या नावांवर फ्रँचायझींनी कोट्यवधींची उधळण केली.
बीसीसीआयने यंदा मिनी लिलावासाठी 18 कोटी रुपयांची मर्यादा घातली होती. यामागचा उद्देश देशांतर्गत क्रिकेटच्या विकासाला चालना देणे हा होता. कारण 18 कोटींहून अधिक रक्कम थेट प्लेअर वेल्फेअर फंडमध्ये जाणार आहे. या नियमामुळे फ्रँचायझींनी आक्रमक बोली लावली तरी खेळाडूंना मिळणारी रक्कम मर्यादित ठेवण्यात आली.
लिलावाच्या पहिल्याच टप्प्यात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमरून ग्रीनवर सर्वांच्या नजरा खिळल्या. फलंदाजांच्या यादीत नाव पुकारले असले तरी त्याच्या अष्टपैलू क्षमतेमुळे संघांमध्ये चुरस पाहायला मिळाली. अखेर कोलकाता नाइट रायडर्सने त्याच्यासाठी तब्बल 25.20 कोटींची बोली लावली. ही मिनी लिलावातील सर्वात मोठी बोली ठरली. मात्र, बीसीसीआयच्या नियमामुळे ग्रीनच्या खात्यात 18 कोटी रुपयेच जमा होणार आहेत.
यंदाच्या लिलावातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच श्रीलंकेच्या खेळाडूने मोठा भाव खाल्ला. वेगवान गोलंदाज मथीशा पथिरानासाठी केकेआरने 18 कोटींची बोली लावली. पथिराना हा केकेआरसाठी दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. अनेक खेळाडूंना रिलीज केल्यानंतर केकेआरकडे मोठी पर्स उपलब्ध असल्याने त्यांनी दोन मोठ्या नावांवर भरघोस खर्च केला. भारतीय खेळाडूंमध्ये फिरकीपटू रवि बिष्णोईवर राजस्थान रॉयल्सने विश्वास दाखवला. त्याच्या बेस प्राईसपासूनच बोली सुरू झाली आणि अखेर राजस्थानने 7.20 कोटी रुपये मोजून त्याला संघात सामील करून घेतले. रवींद्र जडेजासोबत त्याची जोडी राजस्थानसाठी प्रभावी ठरेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
वेंकटेश अय्यरवरही मोठी बोली लागण्याची अपेक्षा होती. त्याची बेस प्राईस 2 कोटी असतानाही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 7 कोटी रुपये मोजून त्याला आपल्या संघात घेतले. मागील हंगामात केकेआरने त्याच्यासाठी 23.75 कोटींची मोठी रक्कम मोजली होती. त्या तुलनेत यंदा वेंकटेश अय्यरला 16.75 कोटींचा फटका बसल्याचे चित्र आहे. याशिवाय जम्मू-काश्मीरचा अनकॅप्ड अष्टपैलू खेळाडू आकिब दार यानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या वेगवान गोलंदाजी आणि अष्टपैलू क्षमतेमुळे दिल्ली कॅपिटल्सने त्याच्यासाठी 8.40 कोटी रुपयांची बोली लावली. एकूणच, आयपीएल 2026 मिनी लिलावात मोठ्या नावांसोबतच नव्या चेहऱ्यांनाही संधी मिळाल्याने आगामी हंगाम अधिक रोमांचक ठरण्याची शक्यता आहे.

