Bihar News : बिहारमधील विचित्र घटना! हे कसं शक्य ? ज्याची अंत्ययात्रा काढली तो स्वत: हसतमुखपणे जिवंत समोर; म्हणाले, "मरणानंतर कोण..."| ViralVideo

Bihar News : बिहारमधील विचित्र घटना! हे कसं शक्य ? ज्याची अंत्ययात्रा काढली तो स्वत: हसतमुखपणे जिवंत समोर; म्हणाले, "मरणानंतर कोण..."| ViralVideo

मेल्यानंतर कोण येईल हे पाहण्यासाठी माजी हवाई दल कर्मचाऱ्याने स्वतःचीच अंत्ययात्रा काढली; बिहारमधील घटना व्हायरल
Published by :
Prachi Nate
Published on

“माझ्या मरणानंतर कोण माझ्या अंत्यदर्शनासाठी येईल?” या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी बिहारमधील एका माजी हवाई दल कर्मचाऱ्याने असा प्रयोग केला की सध्या तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. गया जिल्ह्यातील कोंची गावात राहणारे 74 वर्षीय मोहनलाल यांनी स्वतःच्या मृत्यूचे नाटक रचले आणि स्वतःचीच अंत्ययात्रा काढली. या हटके आणि अनोख्या प्रकारामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली असून, अनेकांनी या घटनेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मोहनलाल हे वायुसेनेतून निवृत्त झालेले आहेत. त्यांनी आपल्या गावासाठी एक समाजोपयोगी कार्य करत, पावसाळ्यात अडचणीत येणाऱ्या अंत्यसंस्कारांच्या समस्येवर उपाय शोधला. स्मशानभूमीची योग्य व्यवस्था नसल्याने गावकऱ्यांना मृतदेहाचे अंत्यसंस्कार करताना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे मोहनलाल यांनी स्वतःच्या खर्चाने तब्बल सहा लाख रुपये खर्च करून गावात नवीन स्मशानभूमी बांधली.

या उपक्रमाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी आणि लोकांची प्रतिक्रिया काय असेल हे समजावे, यासाठी त्यांनी एक वेगळी शक्कल लढवली. त्यांनी स्वतःच्या ‘मृत्यू’ची खोटी बातमी पसरवली आणि तिरडीवर स्वतःचा पुतळा ठेवून संपूर्ण गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली.

या बनावट अंत्ययात्रेत गावातील शेकडो लोकांनी सहभाग घेतला. अनेकांनी अश्रू ढाळले, काहींनी फुलांचे हार अर्पण केले. अनेक गावकरी त्यांच्या मृत्यूने व्यथित झालेले दिसले. मात्र काही वेळानंतर जेव्हा मोहनलाल स्वतः हसतमुखपणे जिवंत समोर आले, तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित झाले.

यावर प्रतिक्रिया देताना मोहनलाल यांनी सांगितले, “मला फक्त एवढं पाहायचं होतं की माझ्या मरणानंतर कोण कोण येईल. आज जी गर्दी झाली, त्यावरून लोक माझ्यावर खरंच प्रेम करतात, हे मला समजलं.”

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अनेकांनी मोहनलाल यांच्या या उपक्रमाचं कौतुक केलं आहे. काहींनी त्यांच्या हटके कल्पनेचं समर्थन केलं, तर काहींनी याला 'वेडसर पण भावनिक' असं म्हटलं आहे.

या घटनेमुळे गावाला कायमस्वरूपी अंत्यसंस्कारासाठी सुविधा मिळाल्या असून, मोहनलाल यांच्या कृतीमुळे समाजात वेगळा संदेश गेला आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे गावकऱ्यांना आता कोणत्याही ऋतूमध्ये अडचण न येता अंत्यसंस्कार करण्यासाठी योग्य जागा उपलब्ध झाली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com