Anil Deshmukh : अजित पवारांच्या निधनाने माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना अश्रू अनावर; दुःखाने झाले निशब्द
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले असून, या घटनेचा धक्का माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही बसला आहे. अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच अनिल देशमुख यांना अश्रू अनावर झाले असून, ते पूर्णपणे भावनाविवश झाल्याचे पाहायला मिळाले.
आज सकाळी विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. या बातमीने अनिल देशमुख यांना गहिवरून आले असून, ते काही काळ पूर्णपणे निशब्द झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दुःख आणि धक्का दिसून येत होता. जवळच्या सहकाऱ्यांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला, मात्र ते कोणतीही प्रतिक्रिया न देता शांतपणे तेथून निघून गेले.
अजित पवार आणि अनिल देशमुख यांचे दीर्घकालीन राजकीय संबंध होते. मंत्रिमंडळात एकत्र काम करताना दोघांमध्ये सुसंवाद होता. राज्याच्या विकासासाठी अनेक निर्णयांमध्ये अजित पवार यांची भूमिका महत्त्वाची राहिली असून, त्यांच्याशी अनेकदा चर्चा आणि मतभेद असूनही परस्पर आदराचे नाते कायम होते. त्यामुळेच त्यांच्या अकाली निधनाने अनिल देशमुख यांना मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे.
या दुःखद घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. राज्याच्या राजकारणात ठळक छाप सोडणारा, रोखठोक बोलणारा आणि निर्णयक्षम नेता काळाच्या पडद्याआड गेला, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या निधनामुळे पवार कुटुंबावर आणि त्यांच्या समर्थकांवर मोठा आघात झाला.
