Former Jharkhand Chief Minister Shibu Soren : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन
(Former Jharkhand Chief Minister Shibu Soren) झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक शिबू सोरेन ऊर्फ गुरुजी यांचे आज (४ ऑगस्ट) सकाळी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात निधन झाले. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. ते काही काळापासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते आणि डायलिसिसवर होते. यापूर्वी त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रियाही करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
11 जानेवारी 1944 रोजी झारखंडच्या रामगड जिल्ह्यातील नेमरा गावात जन्मलेल्या शिबू सोरेन यांचे बालपण संघर्षमय होते. अवघ्या 13व्या वर्षी त्यांनी शिक्षण थांबवून आदिवासी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढा सुरू केला. पुढे त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चा स्थापन केला. शिबू सोरेन यांनी तीनदा झारखंडचे मुख्यमंत्रीपद भूषवले. पहिल्यांदा मार्च 2005 मध्ये मुख्यमंत्री झाले, पण बहुमत सिद्ध करता न आल्यामुळे 10 दिवसांत राजीनामा दिला. दुसऱ्यांदा ऑगस्ट 2008 मध्ये त्यांनी पद स्वीकारले, पण आमदार नसल्यामुळे त्यांना पोटनिवडणूक लढावी लागली. तामार मतदारसंघात पराभव झाल्याने त्यांना पुन्हा पद सोडावे लागले. तिसऱ्यांदा डिसेंबर 2009 मध्ये मुख्यमंत्रिपदावर आले, परंतु मे 2010 मध्ये त्यांनी राजीनामा दिला.
शिबू सोरेन यांच्या निधनामुळे झारखंडच्या राजकारणात आणि आदिवासी समाजाच्या नेतृत्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. विविध पक्षांचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.