Pranjal Khewalkar : एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांच्या अडचणीत वाढ; दुसरा गुन्हा दाखल

Pranjal Khewalkar : एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांच्या अडचणीत वाढ; दुसरा गुन्हा दाखल

माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई तसेच राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई तसेच राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात आधीच पोलिस कोठडीत असलेल्या खेवलकर यांच्यावर पुणे सायबर पोलीस ठाण्यात नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेने तक्रार केली आहे की, खेवलकर यांनी तिची परवानगी न घेता तिचे फोटो आणि व्हिडिओ चोरून काढले. या तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम 66E आणि भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 77 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

काही दिवसांपूर्वी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत खेवलकर यांच्यावर गंभीर आरोप करताना सांगितले होते की, त्यांच्या मोबाईलमधून शेकडो अश्लील फोटो आणि व्हिडिओ आढळले आहेत. या खुलाशामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. पुण्यातील खराडी भागात उघडकीस आलेल्या रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांनी खेवलकर यांना अटक केली होती. त्यांच्यावर नशा आणि बेकायदेशीर पार्टी आयोजित केल्याचे आरोप होते. सध्या ते कोठडीत असताना, नव्या आरोपामुळे त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. पोलिस तपासाचा व्याप आता अधिक वाढण्याची शक्यता आहे.

डॉ. प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसे यांचे जावई असून, रोहिणी खडसे यांचे दुसरे पती आहेत. पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर रोहिणी यांनी बालपणीचा मित्र असलेल्या प्रांजल यांच्याशी लग्न केले. ते राजकारणापासून दूर असून जमीन खरेदी-विक्री, रिअल इस्टेट, इव्हेंट मॅनेजमेंट, साखर व ऊर्जा क्षेत्रातील उद्योग आणि ट्रॅव्हल व्यवसायाशी संबंधित आहेत. त्यांचे वास्तव्य मुक्ताईनगर येथे आहे. या नव्या गुन्ह्यानंतर खेवलकर यांच्या विरोधातील प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. रेव्ह पार्टी आणि आता महिलेच्या तक्रारीमुळे तपास यंत्रणांना नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. पोलिस पुढील चौकशी करत असून, घडामोडींवर राज्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com