Nirmala Gavit: माजी आमदार निर्मला गावित यांचा अपघात; नातवाला फिरवत असताना चारचाकीने दिली धडक
माजी आमदार निर्मला गावित यांचा इगतपुरीजवळ भीषण अपघात झाला आहे. त्या आपल्या नातेसोबत घराजवळ फेरफटका मारत असताना, पाठीमागून येणाऱ्या चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात निर्मला गावित गंभीरपणे जखमी झाल्या आहेत. सध्या त्यांच्यावर नाशिक येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निर्मला गावित 2014 मध्ये इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्या होत्या. त्यांनी थोड्याच कालावधीत ठाकरे गटाचा त्याग करून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता.
सोमवारी झालेल्या या अपघाताचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कारने पाठीमागून धडक दिल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळे या प्रकरणावरून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेष म्हणजे अपघात होऊन 24 तास उलटले तरी, वाहनचालक अद्याप पकडलेला नाही, यावरून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
निर्मला गावित या काँग्रेसच्या माजी नेत्या असून, माजी केंद्रीय मंत्री दिवंगत माणिकराव गावित यांची कन्या आहेत. त्यांनी काँग्रेस सोडून 2019 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला आणि नंतर शिंदे गटात सामील झाल्या. अपघाताच्या घटनेनंतर त्यांच्या कन्या नयना गावित यांनी पोलिसांकडून योग्य तपासाची मागणी केली आहे.

