Vilas Shinde : शिवसेनेच्या माजी महानगरप्रमुखांचा शिंदे गटात प्रवेश, नाशिकमध्ये राजकीय उलथापालथ

Vilas Shinde : शिवसेनेच्या माजी महानगरप्रमुखांचा शिंदे गटात प्रवेश, नाशिकमध्ये राजकीय उलथापालथ

विलास शिंदे यांचा शिंदे गटात प्रवेश; नाशिकमधील ठाकरे गटात मोठी गळती
Published by :
Team Lokshahi
Published on

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)ला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे माजी महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी शनिवारी आपल्या समर्थकांसह शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करणार आहेत.

या प्रवेशादरम्यान सहा माजी नगरसेवक, चार जिल्हा परिषद सदस्य, सहा माजी पंचायत समिती सदस्य आणि सुमारे 40 सरपंच, तसेच संघटनेतील महत्त्वाचे पदाधिकारीही शिंदे गटात दाखल झाले आहेत. यामुळे नाशिकमधील ठाकरे गटात मोठी गळती लागल्याचं स्पष्ट झालं आहे.

सुधाकर बडगुजरनंतर दुसरा मोठा धक्का

गेल्याच आठवड्यात शिवसेना (उबाठा) पक्षाचे उपनेते आणि संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश करून खळबळ माजवली होती. अशातच आता विलास शिंदे यांचा शिंदे गटात प्रवेश ही दुसरी मोठी राजकीय उलथापालथ ठरली आहे.

पदावरून तडकाफडकी हटवले

विलास शिंदे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी अलिकडच्या काळात दोन वेळा भेट घेतल्याचे समजते. नियोजन बैठकीच्या निमित्ताने त्यांनी समर्थकांसह पक्षांतराचे संकेत दिले होते. माध्यमांशी संवाद साधत त्यांनी जाहीर नाराजीही व्यक्त केली. त्यानंतर रात्री संजय राऊत यांनी त्यांना महानगरप्रमुख पदावरून हटवत त्या पदाची जबाबदारी मामा राजवाडे यांच्याकडे सोपवली होती.

नाशिकमधील ही राजकीय गळती ठाकरे गटासाठी निवडणुकांच्या तोंडावर मोठं आव्हान ठरण्याची चिन्हं आहेत. दुसरीकडे, शिंदे गट या प्रवेशाचा उपयोग आगामी राजकीय विस्तारासाठी करत असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com