Sunetra Pawar : धाराशिव ते उपमुख्यमंत्रीपद: सुनेत्रा पवारांचा राजकीय प्रवास चर्चेत
1. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनामुळे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री ही दोन्ही महत्त्वाची पदे रिक्त झाली असून, आता उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. ३१ जानेवारी रोजी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून, त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत.
2. दरम्यान, सुनेत्रा पवार यांचे धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्याशी असलेले घट्ट नाते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सुनेत्रा पवार या मूळच्या धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राणा जगजितसिंह पाटील यांच्या त्या बहीण आहेत. त्यांचे बालपण धाराशिव जिल्ह्यातील तेर गावात गेले असून, ग्रामीण जीवनाचा जवळून अनुभव त्यांनी लहानपणापासून घेतला आहे.
3. सुनेत्रा पवार या अनेकदा सांगतात की, सामाजिक कार्य आणि लोकांशी जोडलेपणाची शिकवण त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाली. त्यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते आणि गावातील प्रभावशाली व्यक्तींपैकी एक होते. घराघरात जाऊन लोकांना भेटणे, त्यांचे प्रश्न समजून घेणे, संवाद साधणे हे संस्कार त्यांच्या बालपणातच रुजले, असे त्या सांगतात.
4. पद्मसिंह पाटील आणि शरद पवार यांच्यातील दीर्घकालीन मैत्रीमुळे सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांचा विवाह ठरला. १९८५ मध्ये विवाहानंतर सुनेत्रा पवार बारामतीत स्थायिक झाल्या. त्या काळात अजित पवार यांनी अद्याप राजकारणात पाऊल टाकले नव्हते. त्यांच्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात सुनेत्रा पवार यांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळत अजित पवार यांना व्यवसायातही मोलाची साथ दिली.
5. १९९३ मध्ये मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांनंतर शरद पवार मुख्यमंत्री झाले. त्यानंतर अजित पवार आणि सुनेत्रा पवार मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर राहू लागले. त्याच काळात देशात कॉम्प्युटर क्रांती वेग घेत होती. सुनेत्रा पवार यांनी कॉम्प्युटर शिकण्याची ठाम इच्छा व्यक्त केली आणि ती पूर्ण करून तंत्रज्ञानाशी स्वतःला जोडून घेतले. आज त्या राज्याच्या नेतृत्वाच्या केंद्रस्थानी येत असून, त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
