Election Campaign : आजपासून 29 महापालिकेत प्रचाराला गती, उमेदवारांसोबत दिग्गजांच्या तोफा धडाडणार

Election Campaign : आजपासून 29 महापालिकेत प्रचाराला गती, उमेदवारांसोबत दिग्गजांच्या तोफा धडाडणार

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार आता निर्णायक टप्प्यात प्रवेश करत असून, आजपासून प्रत्येक उमेदवाराचा प्रचाराचा वेग मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार आता निर्णायक टप्प्यात प्रवेश करत असून, आजपासून प्रत्येक उमेदवाराचा प्रचाराचा वेग मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. उमेदवारी अर्जांची छाननी, माघारी आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर आता थेट मैदानातील राजकीय लढत सुरू झाली आहे. त्यामुळे आजपासून राज्यातील विविध शहरांमध्ये प्रचाराचा जोर स्पष्टपणे दिसून येणार आहे.

या टप्प्यात उमेदवार स्वतः मैदानात उतरून मतदारांशी थेट संवाद साधणार असून, घराघरांत भेटी, पदयात्रा, सभा, कोपरा बैठका आणि प्रचार रॅल्या मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणार आहेत. यासोबतच, प्रमुख राजकीय पक्षांकडून प्रचारासाठी राज्यातील आणि राष्ट्रीय स्तरावरील दिग्गज नेते मैदानात उतरणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे प्रचारात आरोप-प्रत्यारोपांना देखील अधिक धार येण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत प्रचाराच्या पद्धतींमध्ये नवीन प्रयोग पाहायला मिळणार आहेत. पारंपरिक सभा आणि रॅलींसोबतच, युनिक प्रचार रॅल्या, थीम-आधारित पदयात्रा, सोशल मीडियावर आक्रमक प्रचार, व्हिडीओ संदेश, रील्स आणि लाइव्ह संवाद यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाणार आहे. युवक मतदारांना आकर्षित करण्यासाठी डिजिटल प्रचारावर विशेष भर दिला जाणार आहे.

राज्यातील २९ महापालिकांमध्ये वेगवेगळ्या राजकीय समीकरणांमुळे प्रचाराची दिशा वेगळी असणार आहे. काही ठिकाणी थेट दोन पक्षांमध्ये लढत असताना, काही महानगरपालिकांमध्ये बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांमुळे बहुरंगी लढती पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रभागात प्रचाराची रणनीती वेगळी आखण्यात येत आहे.

दरम्यान, प्रमुख पक्षांकडून दिग्गज नेत्यांच्या प्रचार दौऱ्यांचे वेळापत्रक आखण्यात आले असून, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री तसेच पक्षाध्यक्ष आणि प्रभावशाली नेते प्रचारासाठी शहरोगणिक सभा घेणार आहेत. या नेत्यांच्या उपस्थितीमुळे प्रचाराचा उत्साह वाढणार असून, मतदारांमध्ये राजकीय चर्चा रंगणार आहेत.

एकूणच, आजपासून राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचणार असून, येत्या काही दिवसांत राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे आहेत. कोणता पक्ष मतदारांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचतो, कोणाची प्रचार रणनिती यशस्वी ठरते आणि दिग्गजांच्या तोफांचा नेम कुणाच्या बाजूने लागतो, यावरच निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com