India IT Sector : भारताच्या IT सेक्टरची कामगिरी अन् संपूर्ण जगाला घाम फुटला, GDP वाढीने अमेरिकाही थक्क
भारताच्या अर्थव्यवस्थेने पाच तिमाहींनंतर सर्वात वेगवान वाढ नोंदवली आहे. एप्रिल-जून 2025-26 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) 7.8% वाढले असून ही वाढ तज्ज्ञांच्या अंदाजापेक्षा खूप जास्त आहे. अर्थतज्ज्ञांनी GDP वाढ दर 6.3% ते 7% दरम्यान राहील असे भाकीत केले होते, तर रिझर्व्ह बँकेने 6.5% असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु प्रत्यक्ष आकडेवारीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (NSO) आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी याच तिमाहीत GDP वाढ 6.7% होती, जी मागील 15 महिन्यांतील सर्वात कमी होती. यंदाच्या तिमाहीतील आकडेवारीतून स्पष्ट होते की भारतीय अर्थव्यवस्था आता पुन्हा गती घेत आहे.
या वाढीमध्ये सर्वात मोठा वाटा सेवा क्षेत्राचा आहे. सेवा क्षेत्राने तब्बल 9.3% वाढ नोंदवली आहे. देशाच्या एकूण GDP मध्ये 55% पेक्षा जास्त योगदान सेवा क्षेत्रातून येते. म्हणजेच, प्रत्येक 100 रुपयांच्या GDP पैकी जवळपास 55 रुपये हे वित्तीय सेवा, आयटी-बीपीओ, हॉटेल-पर्यटन, वाहतूक-संप्रेषण आणि रिअल इस्टेटसारख्या क्षेत्रांमधून मिळत आहेत.
विशेषतः आयटी आणि व्यवसाय सेवा (सॉफ्टवेअर व तंत्रज्ञान निर्यात), तसेच वित्तीय सेवांनी निर्यात आणि देशांतर्गत मागणी यामध्ये लक्षणीय भर टाकली आहे. बँकिंग, विमा, गुंतवणूक सेवा, आयटी कंपन्या, पर्यटन-हॉटेल व्यवसाय आणि वाहतूक क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीमुळे अर्थव्यवस्थेने 'रॉकेट स्पीड' पकडल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
भारताच्या IT सेक्टरची ताकद आता जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. तंत्रज्ञान निर्यातीतून येणारे उत्पन्न, स्टार्टअप्सची वाढ, तसेच जागतिक बाजारपेठेतील मागणी यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळत आहे. या दमदार आकडेवारीनंतर भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.