Pune News : घायवळ टोळी पुन्हा चर्चेत! घायवळ टोळीचा साथीदार अमोल लाखे अडचणीत...
थोडक्यात
घायवळ टोळीचा साथीदार अमोल लाखे अडचणीत
फसवणुकीच्या प्रकरणामुळे टोळी पुन्हा चर्चेत
कर्जाचे आमिष दाखवून फसवणूक
पुणे शहरातील गुन्हेगारी जगतात पुन्हा एकदा घायवळ टोळीचे नाव पुढे आले आहे. निलेश घायवळचा जवळचा साथीदार म्हणून ओळखला जाणारा अमोल दत्ता लाखे याच्यावर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फसवणूक आणि कागदपत्रांचा गैरवापर केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे घायवळ टोळीच्या हालचालींवर पुन्हा एकदा पोलिसांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
कर्जाचे आमिष दाखवून फसवणूक
या प्रकरणात सुरेश जालिंदर ढेंगळे (वय 32, रा. पारा, ता. वाशी, जि. धाराशिव) यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादीनुसार, लाखेने त्यांना शेती आणि व्यवसायासाठी कर्ज मिळवून देतो असे सांगून आधार कार्ड, पॅन कार्ड, शेती उत्पन्न दाखले आणि फोटो अशी वैयक्तिक कागदपत्रे घेतली. यानंतर, त्याने या कागदपत्रांचा गैरवापर करून ढेंगळे यांच्या नावावर जिओ कंपनीचे सिमकार्ड (क्रमांक 9370622951) घेतले आणि ते स्वतः वापरले. हे सिमकार्ड त्याने एचडीएफसी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक खात्यांशी लिंक केले असल्याचे तपासात समोर आले आहे.
टोळीशी थेट संबंध उघड
वारजे पोलिसांनी केलेल्या तपासात या सिमकार्डचा वापर निलेश घायवळ आणि त्याच्या साथीदारांनी गुन्हेगारी कामकाजासाठी केल्याचे उघड झाले आहे. प्राथमिक चौकशीत अमोल लाखे हा घायवळ टोळीशी थेट संबंधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 318(4) आणि दूरसंचार अधिनियम 2023 च्या कलम 42(3)(e) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
घायवळ टोळीवर पुन्हा पोलिसांचे लक्ष
अमोल लाखे आणि निलेश घायवळ या दोघांवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. वारजेतील या नव्या प्रकरणामुळे घायवळ टोळीच्या आर्थिक आणि इतर बेकायदेशीर व्यवहारांचा नवा धागा पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.
