Girish Mahajan On Dada Bhuse : "नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी ट्रम्प विनंती करतील" दादा भुसे यांचं मिश्किल बाण, महाजनांचा प्रतिटोला

Girish Mahajan On Dada Bhuse : "नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी ट्रम्प विनंती करतील" दादा भुसे यांचं मिश्किल बाण, महाजनांचा प्रतिटोला

नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा घोळ काही केल्या मिटण्याचं नाव घेत नाही. मंत्री दादा भुसे यांनीच ट्रम्प यांचा उल्लेख करत एक मिश्किल टिप्पणी केली आणि त्यावरून राजकीय चिमटे आणि टोलेबाजी पुन्हा तापली.
Published by :
Team Lokshahi
Published on

नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा घोळ काही केल्या मिटण्याचं नाव घेत नाही आणि आता या वादात अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचंही नाव अचानकपणे पुढं आलं आहे! हो, चुकून नाही थेट मंत्री दादा भुसे यांनीच ट्रम्प यांचा उल्लेख करत एक मिश्किल टिप्पणी केली आणि त्यावरून राजकीय चिमटे आणि टोलेबाजी पुन्हा तापली.

नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी सुरू असलेल्या रस्सीखेचीत भाजप नेते गिरीश महाजन, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, शिवसेनेचे दादा भुसे आणि माणिक कोकाटे हे चार दिग्गज इच्छुक होते. मात्र, महायुतीतील अंतर्गत मतभेदांमुळे हा मुद्दा प्रलंबितच राहिला. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचं महत्त्व वाढलेलं असताना, सत्ताधारी पक्षांत हा मुद्दा प्रतिष्ठेचा झाला आहे. अखेर तात्पुरता तोडगा म्हणून सर्वच इच्छुक मंत्र्यांना कुंभमेळा मंत्री समितीत स्थान देण्यात आलं ज्याचे प्रमुख गिरीश महाजन आहेत.

गृहमंत्री अमित शाह यांचा नुकताच महाराष्ट्र दौरा झाला. या दौऱ्यात मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बंद दाराआड चर्चा झाली. पत्रकारांनी याबाबत विचारल्यावर दादा भुसे यांनी वक्तव्य केलं. "नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा वाद आता थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडेच न्यावा लागेल!"

त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये हास्याची लाट उसळली, पण यामुळे विरोधकांनी मात्र संधी साधली. शिवसेना (ठाकरे गट) ने तिखट प्रतिक्रिया देत भुसे यांना सुनावलं "ट्रम्प आधी तुमच्या दारात उभे तरी करतात का ते बघा. सध्या ते भारतावर टॅरिफ वाढवतायत, आणि तुम्ही त्यांच्याकडं पालकमंत्रीपदासाठी शिफारस मागता?"

दरम्यान, अमळनेर येथे एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना गिरीश महाजन यांनी भुसे यांच्या विधानावर मिश्किल शैलीत प्रत्युत्तर दिलं. "कदाचित भुसे साहेबांचे ट्रम्प यांच्याशी फारच घनिष्ठ संबंध असतील. तेच त्यांना फोन करून सांगतील – नाशिकचा प्रश्न सोडवा!"

"माझं अमेरिकेशी काहीही कनेक्शन नाही. ट्रम्पबरोबर तर नाहीच नाही. नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून मुख्यमंत्री फडणवीसांशी सुद्धा माझी ट्रम्पविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही."

सध्या नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न तसाच अनुत्तरित आहे. कुंभमेळ्याची तयारी, विकासकामे, प्राधिकरणाचं कामकाज हे सर्व सध्या कुंभमेळा मंत्री समितीच्या सल्ल्याने पार पडलं जातंय. पण खरा पालकमंत्री कोण, हे अजूनही स्पष्ट नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com