Sachin Tendulkar : वानखेडेवर इतिहास! सचिनची मराठी ओपनिंग, मेस्सीसमोर खास क्षण
(Sachin Tendulkar and lionel messi In Wankhede Stadium ) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि फुटबॉलचा जादुगार लिओनेल मेस्सी यांच्या ऐतिहासिक भेटीने क्रिकेट आणि फुटबॉल चाहत्यांना एक अविस्मरणीय अनुभव दिला. मेस्सीच्या आगमनावर मुंबईकरांनी आणि स्टेडियममधील चाहत्यांनी जल्लोष केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेस्सीला स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित केले, आणि मेस्सीच्या हस्ते राज्य सरकारच्या 'प्रोजेक्ट महादेवा'चा शुभारंभ करण्यात आला. या प्रोजेक्टअंतर्गत 13 वर्षांखालील 60 मुलांना फुटबॉल शिकवले जाईल.
सचिन तेंडुलकरची उपस्थिती
'प्रोजेक्ट महादेवा'च्या उद्घाटनानंतर सचिन तेंडुलकर मैदानावर आले आणि त्यांनी मेस्सीसोबत संवाद साधला. सचिनने स्टेडियममधील चाहत्यांना मराठीत संबोधित करत आभार मानले. तसेच, सचिन आणि मेस्सी यांनी एकमेकांना गळाभेट दिली आणि ऑटोग्राफ असलेली 10 नंबरची जर्सी मेस्सीला भेट दिली, तर मेस्सीने सचिनला फुटबॉल भेट दिला.
सचिनचे मराठीत भाषण
सचिनने चाहत्यांसमोर मराठीत भाषण करत आभार व्यक्त केले. "नमस्कार मुंबई! तुमच्या प्रेमामुळे आणि समर्थनामुळे मी वाचलो आहे. तुम्ही लिओ, लुईस आणि रॉड्रिग्सचा जे स्वागत केले, त्याबद्दल धन्यवाद," असं सांगत सचिनने त्यांच्या वतीने आभार मानले.
सचिनने वानखेडे स्टेडियमच्या मैदानावर आपल्या अनेक आठवणींना उजाळा दिला. "या मैदानावर अनेक स्वप्न पूर्ण झाली आहेत," असं सांगताना त्याने 2011 च्या वर्ल्ड कपच्या विजयाची आठवण केली. त्याच वानखेडे स्टेडियममध्ये भारताने श्रीलंकेला हरवून वर्ल्ड कप जिंकला होता. "तुमच्या पाठिंब्याशिवाय त्या सुवर्णक्षणांचा अनुभव घेणं शक्य होणार नव्हतं," असं सचिनने आपल्या चाहत्यांना सांगितलं.

