Gold Rate : ऐन लग्नसराईत सोन्याचा भाव 96 हजारांच्या घरात
डोनाल्ड ट्रम्प यांच्या जागतिक धोरणांमुळे सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. आज सोन्याचा भाव 93 हजार 200 रुपये तर जीएसटीसह 95 हजार 996 रुपये इतका झाल्याने ग्राहकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवल्याचे चित्र सराफा बाजारात पाहायला मिळत आहे. सोन्याचे भाव सातत्याने वाढत असल्याने ग्राहक हे वेट अँड वॉचच्या भूमिकेत आल्याचे चित्र समोर आलं असून वाढत्या दराचा फायदा घेण्यासाठी सोने खरेदीपेक्षा सोने मोडीकडे ग्राहकांचा सर्वात अधिक कल सराफा बाजारात पाहायला मिळत आहे. सोन्याचा वाढता दर हा सर्वसामान्यांना न परवडणारा असल्यामुळे काही ग्राहक सोने खरेदी न करता सोन्याचे भाव कमी होतील, या आशेने परत निघून गेले आहेत.
सोनं हा अनेक महिलांच्या आवडीचा विषय. आपल्याला अंगभर दागिने असावेत, असं प्रत्येक महिलेला वाटत असतं. हे सोन खरेदी करण्यासाठी अनेकजण पोटाला चिमटा घेत बचत करत असतात. मात्र गेल्या काही दिवसांत सोन्याचे दर हे प्रचंड वाढले आहेत. त्यात लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्याने शुभकार्यात थोडतरी सोनं करावं असं सर्वांची इच्छा असते. मात्र सोन्याच्या वाढत्या दरामुळे ग्राहकांच्या तोंडाला फेस आला आहे. त्यात आता ९५ हजारांच्या पुढे गेलेलं सोनं लाखाचा टप्पा पार करतोय की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.