Donald Trump On Tariff : भारतासाठी दिलासा देणारी दोन मोठी संकेतं! ट्रम्प यांनी टॅरिफबद्दल घेतला वेगळा निर्णय आणि दुसर म्हणजे....
जागतिक राजकारण आणि व्यापाराच्या पातळीवर भारतासाठी पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांची येत्या 15 ऑगस्टला होणारी ऐतिहासिक भेट केवळ रशिया-युक्रेन युद्धाच्या संदर्भातच नव्हे, तर भारताच्या व्यापारी हितासाठीही निर्णायक ठरू शकते. या भेटीच्या अनुषंगाने भारतीय बाजारपेठेला दोन मोठ्या संकेत मिळाले आहेत. भारतावरील जाचक टॅरिफ कमी होण्याची शक्यता आणि सोन्याच्या किंमतीत झालेली घसरण.
सध्या भारताच्या अनेक वस्तूंवर अमेरिकेने तब्बल 50 टक्के आयातशुल्क (टॅरिफ) लादले आहे. या निर्णयाचा फटका वस्त्रोद्योग, मत्स्योद्योग आणि इतर अनेक निर्यात क्षेत्रांना बसत आहे. ट्रम्प यांनी हे टॅरिफ भारत-रशिया तेल व्यापारावर रोष व्यक्त करण्यासाठी लादले होते. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल आयात करतो आणि काही प्रमाणात इतर देशांना विकतो, हा मुद्दा ट्रम्प यांनी वारंवार उपस्थित केला आहे.
राजकीय विश्लेषक मायकल गुकेलमॅन यांच्या मते, ट्रम्प-पुतिन भेट ही भारतासाठी ‘संधीचं खिडकी’ ठरू शकते. जर या चर्चेतून रशिया-युक्रेन युद्धविरामाचा निर्णय झाला, तर अमेरिकेच्या दृष्टीने रशियावर आणि रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांवर दबाव टाकण्याची गरज उरणार नाही. परिणामी, भारतावरील टॅरिफ कमी करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
टॅरिफवाढीनंतर अमेरिकेतही या धोरणाला विरोध वाढला आहे. भारतासारख्या महत्त्वाच्या व्यापार भागीदारावर जाचक शुल्क लावल्याने दोन्ही देशांतील परस्पर विश्वास कमी होईल, असा युक्तिवाद तज्ञांकडून होत आहे. भारतातही या निर्णयावर नाराजी असून, अमेरिकेच्या अटी स्वीकारू नयेत, अशी भूमिका काही व्यावसायिक आणि धोरण तज्ञांनी स्पष्ट केली आहे.
सोन्यावरील टॅरिफ प्रस्ताव मागे
दरम्यान, टॅरिफच्या आणखी एका चर्चित निर्णयावर ट्रम्प यांनी माघार घेतली आहे. काही दिवसांपासून अमेरिकेत सोन्यावर मोठ्या प्रमाणात टॅरिफ बसणार असल्याची चर्चा होती. या अफवेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती झपाट्याने वाढल्या होत्या. मात्र, ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून स्पष्ट केले की, "सोन्यावर कोणत्याही प्रकारचा टॅरिफ लावला जाणार नाही".
या घोषणेनंतर सोन्याच्या बाजारात तत्काळ परिणाम दिसून आले. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या किंमतीत 1,400 पेक्षा जास्त घसरण झाली. देशांतर्गत बाजारातही इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) आकडेवारीनुसार 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,00,201 वरून 99,975 पर्यंत घसरला, म्हणजेच 244 ची घट नोंदली गेली.
भारतीय अर्थव्यवस्थेसाठी पुढील आठवडा निर्णायक
एकीकडे सोन्याच्या किंमती घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला असला, तरी व्यापारी जगताचं लक्ष आता 15 ऑगस्टकडे लागलं आहे. ट्रम्प-पुतिन भेटीतून जर युद्धविरामाचा मार्ग मोकळा झाला, तर भारतावरील टॅरिफ कमी होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे भारताच्या निर्यातदारांना आणि गुंतवणूकदारांना थेट फायदा होईल.
आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चिततेत भारतासाठी हे दोन दिलासा देणारे संकेत आहेत. मात्र, दोन्ही बाबतीत अंतिम निर्णय पुढील काही दिवसांतच स्पष्ट होईल. जगभरातील व्यापारी, गुंतवणूकदार आणि राजकीय विश्लेषक यांची नजर आता वॉशिंग्टन–मॉस्को चर्चेकडे लागली आहे.