Eknath Shinde : लाडक्या बहिणींना खुशखबर! २१०० रुपयांचा हप्ता देणारच एकनाथ शिंदेंची ग्वाही
राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून, सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीच्या प्रचारसभेला संबोधित केले. या वेळी त्यांनी मतदारांना उद्देशून भावनिक आणि विकासाभिमुख आवाहन करत, “ही निवडणूक केवळ मतदानापुरती मर्यादित नाही, तर सिंधुदुर्गाचा आणि आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा फैसला करणारी आहे,” असे ठामपणे सांगितले.
शिंदे यांनी पुढे स्पष्ट केले की, महायुतीला दिलेले प्रत्येक मत हे थेट विकासाला दिलेले मत आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी न पडता मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. या सभेला मोठी गर्दी उसळली होती. कोकणात महायुतीबाबत सकारात्मक वातावरण असल्याचा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
सभेनंतर पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली. लाडक्या बहिणींना सध्या मिळणारा १५०० रुपयांचा हप्ता वाढवून २१०० रुपये कधी मिळणार, असा सवाल पत्रकारांनी उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना शिंदे म्हणाले, “आम्ही आमच्या वचननाम्यात जे काही जाहीर केले आहे, ते योग्य वेळी आणि पूर्णपणे अंमलात आणणार आहोत. आमचा वचननामा हा १०० टक्के पाळला जाणार आहे. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही.” विरोधक अफवा पसरवत असले तरी सरकार आपल्या शब्दावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे आगामी काळात लाडक्या बहिणींना २१०० रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.
कोकणातील राजकीय परिस्थितीवर बोलताना शिंदे म्हणाले की, “कोकणात सगळीकडे महायुतीचं भगवं वादळ घोंगावत आहे.” पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे आणि दीपक केसरकर यांची एकजूट झाल्याने महायुती अधिक मजबूत झाली आहे. कार्यकर्त्यांनी ठरवले आहे की, राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हा परिषद काम करेल. त्यामुळे ही जिल्हा परिषद महायुती १०० टक्के जिंकेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
कोकणाच्या विकासाबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यामुळे कोकणासाठी विशेष प्रकल्पांचे करार झाले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात उद्योग कोकणात येतील, स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील. नवीन मुंबई–गोवा महामार्गाचा डीपीआर तयार झाला असून, हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कोकणातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
थोडक्यात
वचननाम्यातील आश्वासन पाळणार; लाडकी बहीण योजना बंद होणार नाही
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद महायुती १००% जिंकेल,
मुंबई–गोवा महामार्गामुळे पर्यटनाला चालना.
