Ladki Bahin Yojana  : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! जानेवारीचे 1500 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! जानेवारीचे 1500 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बाल विकास विभागाने 23 जानेवारीपासून ही रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती दिली आहे. सोमवारी रात्रीपासून अनेक महिलांना बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे मेसेज मिळू लागले आहेत.

98 कोटींचा निधी वर्ग जानेवारीचा हप्ता वितरित करण्यासाठी 18 फेब्रुवारी रोजी सामाजिक न्याय विभागाने महिला व बाल विकास विभागाकडे तब्बल 98 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला होता. निधी प्राप्त होताच हप्ते जमा करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली. त्यामुळे महिलांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

लाभार्थ्यांची संख्या कमी का झाली?

डिसेंबर 2025 चा हप्ता जानेवारी 14 च्या सुमारास 1 कोटी 60 लाख महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. मात्र सुरुवातीला जुलै 2024 मध्ये योजनेची सुरुवात झाली तेव्हा लाभार्थ्यांची संख्या सुमारे 2 कोटी 46 लाख होती. राज्य सरकारने ई-केवायसी बंधनकारक केल्यानंतर 1 कोटी 90 लाख महिलांनी प्रक्रिया पूर्ण केली. त्यापैकी योग्य माहिती भरलेल्या 1 कोटी 60 लाख महिलांनाच डिसेंबरचा हप्ता मिळाला. त्यामुळे लाभार्थ्यांच्या संख्येत घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

ई-केवायसी दुरुस्तीसाठी अंतिम संधी

ई-केवायसी करताना काही महिलांनी चुकीचे पर्याय निवडले होते. त्यामुळे त्यांना 31 मार्च 2026 पर्यंत दुरुस्तीची संधी देण्यात आली आहे. ही अंतिम संधी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आतापर्यंत किती हप्ते?

जुलै 2024 ते जानेवारी 2026 या कालावधीत विचार केल्यास महिलांना आतापर्यंत 19 हप्त्यांची रक्कम मिळाली आहे. दरमहा 1500 रुपयांची मदत महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी महत्त्वाची ठरत आहे. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना चा लाभ घेणाऱ्या महिला शेतकऱ्यांना दरमहा 500 रुपये अतिरिक्त मिळत आहेत. राज्य सरकारच्या या योजनेमुळे लाखो महिलांना आर्थिक आधार मिळत असून, आता सर्वांचे लक्ष पुढील हप्त्याकडे लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com