DA Hike : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; महागाई भत्तात 'इतका' टक्क्यांची वाढ
महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी राज्य सरकारकडून मोठी आनंदाची बातमी जाहीर झाली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सध्या 53 टक्के असलेला महागाई भत्ता आता 55 टक्क्यांवर पोहोचणार आहे. ही वाढ केवळ कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांनाच नव्हे, तर निवृत्ती वेतनधारकांनाही लागू होणार आहे. त्यामुळे लाखो कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.
विशेष म्हणजे, ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आली आहे. याचा अर्थ, कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना जानेवारीपासून आतापर्यंतच्या महागाई भत्ता फरकाची रक्कम एकत्र मिळणार आहे. यामुळे त्यांना आठ महिन्यांचा थकीत महागाई भत्ता मिळणार असून, त्याचा फायदा वेतन आणि पेन्शनमध्ये दिसून येईल. राज्य सरकारचा हा निर्णय सध्याच्या महागाईच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा ठरणार आहे. तज्ज्ञांच्या मते, महागाई भत्त्यातील ही वाढ घरगुती खर्च आणि महागाईचा ताण काही प्रमाणात कमी करण्यात मदत करेल.