YouTube वर Live Stream साठी नवा नियम; आता प्रत्येकाला मिळणार नाही परवानगी

YouTube वर Live Stream साठी नवा नियम; आता प्रत्येकाला मिळणार नाही परवानगी

गुगलने युट्युबच्या धोरणामध्ये मोठा बदल करत ‘लाईव्ह स्ट्रीमिंग’साठी वयोमर्यादा वाढवली आहे. 22 जुलैपासून युट्युबवर Live Stream करण्यासाठी वयो मर्यादा ठेवण्यात आली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

गुगलने युट्युबच्या धोरणामध्ये मोठा बदल करत ‘लाईव्ह स्ट्रीमिंग’साठी वयोमर्यादा वाढवली आहे. 22 जुलै 2025 पासून युट्युबवर Live Stream करण्यासाठी वयाची किमान अट 16 वर्ष करण्यात आली आहे. यापूर्वी ही मर्यादा 13 वर्ष होती. आता यापुढे 16 वर्षांखालील युजर्सना थेट युट्युबवर लाईव्ह जाता येणार नाही. गुगलने आपल्या अधिकृत सपोर्ट पेजवर ही माहिती जाहीर केली असून, यामागचा उद्देश म्हणजे मुलं आणि तरुणांसाठी युट्युबला अधिक सुरक्षित बनवणे हा आहे. सध्या जगभरात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.

या गुन्ह्यांना सर्वाधिक लहान मुले आणि किशोरवयीन तरुण बळी पडतात. यामुळेच गुगलने युट्युबवर लाईव्हसाठीची वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन धोरणानुसार, जर एखादा युजर 16 वर्षांखालील असेल आणि त्याला लाइव्ह स्ट्रीम करणे आवश्यक असेल, तर काही कठोर अटींचे पालन करणे बंधनकारक असेल. यामध्ये सर्वात महत्त्वाची अट म्हणजे, 16 वर्षांखालील युजर लाईव्ह जात असताना त्याच्यासोबत एक प्रौढ व्यक्ती उपस्थित असणे आवश्यक आहे. जर युट्युबवर एखादा अल्पवयीन युजर एकटाच लाईव्ह जात असेल, तर त्याचे लाईव्ह थेट बंद करण्यात येईल आणि चॅट फीचरही बंद होईल.

याशिवाय 16 वर्षांखालील युजर्सना त्यांच्या युट्युब चॅनेलचे व्यवस्थापन त्यांच्या पालकांना हस्तांतरित करावे लागणार आहे. अशा प्रकारे पालकांकडे त्या खात्याचा संपूर्ण ॲक्सेस असेल. गुगलने याआधीही लहान मुलं आणि तरुण युजर्ससाठी अनेक सुरक्षाविषयक फीचर्स युट्युबवर लागू केले आहेत. यात 'Made for Kids' कंटेंट, पर्यवेक्षित खाती, पालकांसाठी कंट्रोल पॅनेल आदींचा समावेश आहे. या उपयोजनांद्वारे युट्युब लहान वयाच्या युजर्ससाठी एक सुरक्षित डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणून विकसित होत आहे.

या नव्या नियमामुळे अनेक युजर्सना सुरुवातीला अडचण वाटू शकते. मात्र, सायबर सुरक्षितता आणि मुलांच्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने ही पावलं अत्यंत आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. युट्युबने याआधीही आपल्या तरुण युजर्ससाठी वेळोवेळी प्रायव्हसी व सिक्युरिटीबाबत जनजागृती केली असून, नव्या धोरणांमुळे हे प्रयत्न अधिक प्रभावी ठरणार आहेत. 22 जुलैपासून हे धोरण अंमलात येणार असल्याने युजर्सनी आपल्या खात्याचे वय आणि अटी तपासून आवश्यक ते बदल करावेत, असे सूचित करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com