Palghar News : सरकारची थट्टा म्हणावं की काय? अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत म्हणून 2 रूपये 30 पैशांची भरपाई...
अवकाळी पावसामुळे राज्यभरात शेतकऱ्यांचं कंबरड मोडलं असतानाच पालघरमध्ये सरकारकडून एका शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नुकसान भरपाई म्हणून या शेतकऱ्याला फक्त दोन रुपये तीस पैसे मिळाले असून यामुळे या शेतकऱ्याकडून संताप व्यक्त करण्यात येतोय.
वाडा तालुक्यातील सिल्लोत्तर येथील मधुकर बाबुराव पाटील या शेतकऱ्याच्या नावावर अकरा एकर जागा असून नुकसान भरपाई म्हणून त्यांच्या बँक खात्यात सरकारकडून दोन रुपये तीस पैसे जमा करण्यात आले आहेत. प्रधानमंत्री फसल योजनेतून हे पैसे जमा झाल्याचा मेसेज मधुकर पाटील यांना आल्यानंतर रक्कम बघून त्यांना धक्काच बसला.
अवकाळी पावसामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असतानाच शेतकऱ्यांकडून सरकारकडे मदतीची अपेक्षा केली जाते अशातच दोन रुपये मदत देऊन सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करत असल्याची भावना व्यक्त करत मधुकर पाटील आणि त्यांच्या कुटुंबाकडून संताप व्यक्त करण्यात येतोय..

