आता आजोबांच्या संपत्तीवर नातवाचा हक्क नाही? असं का? जाणून घ्या
आता आजोबांच्या संपत्तीवर नातवाचा हक्क नाही? असं कुठे असं का हा प्रश्न आपल्याला पडला असेल. पण हो आता कोर्टाने सांगितलं आहे की, आजोबांच्या संपत्तीवर नातवाचा कोणताही हक्क नसणार आहे, नक्की काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया सविस्तरमध्ये या बातमीमध्ये
मुंबई हायकोर्टाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे, ज्यात नातवंडांना त्यांच्या आजोबांच्या संपत्तीवर जन्मसिद्ध हक्क नाही असे स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे 2005 मध्ये लागू झालेल्या हिंदू वारसा हक्क कायद्यातील सुधारणा अधिक स्पष्ट झाल्या आहेत. यानुसार, संयुक्त कुटुंबातील संपत्तीत मुलींना मुलांप्रमाणे समान हक्क आहेत, पण मुलींच्या मुलांना (नातवंडांना) हा हक्क मिळत नाही.
नेमकं प्रकरण काय?
27 ऑक्टोबर 2025 रोजी नागपूर खंडपीठाने विश्वंभर विरुद्ध सुनंदा या खटल्यात निर्णय दिला. यामध्ये नातीने आजोबांच्या संपत्तीत तिच्या हक्काचा दावा केला होता. आजोबांचा मृत्यू झाल्यानंतर, त्यांची 4 मुले आणि 4 मुली होती. नातीने तिच्या आईच्या वतीने कोर्टात दावा केला, कारण २००५ मध्ये मुलींना वडिलांच्या संपत्तीत समान हक्क मिळाला होता.
कोर्टाचा निर्णय
कोर्टाने नातीचा दावा फेटाळला आणि स्पष्ट केले की, मुलींच्या मुलांना (नातवंडांना) वडिलांच्या संपत्तीत हक्क नाही. 2005 च्या सुधारणेनुसार, मुला-मुलींना समान हक्क मिळाले असले तरी, नातवंडांना हे हक्क नाहीत. तसेच, नात आजोबांच्या पुरुष वंशातील वंशज नसल्यामुळे, तिच्या दाव्यात कोणताही कायदेशीर आधार नाही.
हिंदू मिताक्षरा कायदा काय आहे?
हिंदू मिताक्षरा कायदा संयुक्त कुटुंबातील संपत्तीवर वारसा हक्क ठरवणारा एक प्रमुख कायदा आहे. या कायद्यानुसार, मुलगा आणि त्याचे वंशज वडिलांच्या संपत्तीत जन्मापासून हक्क मिळवू शकतात, पण मुलींच्या मुलांसाठी हा हक्क नाही. 2005 मध्ये कायद्यात सुधारणा झाली, ज्यामुळे मुलींनाही वडिलांच्या संपत्तीत समान हक्क मिळाले. तथापि, या सुधारणेत नातवंडांचे हक्क स्पष्टपणे समाविष्ट नाहीत. मिताक्षरा कायद्याने पुरुष वंशावर आधारित 'लाइनल डिसेंडंट' (वंशावळ) मानले आहे, ज्यामुळे नातवंडांना हा हक्क मिळत नाही.

