ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला बनणार ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार; 'या' तारखेला जाणार आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर

ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला बनणार ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार; 'या' तारखेला जाणार आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर

भारतीय वायुदलातील ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला पुढील महिन्यात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणार आहेत.
Published by :
Rashmi Mane
Published on

भारताची अंतराळ संशोधन क्षेत्रातील झेप आता नव्या टप्प्यावर पोहोचली आहे. भारतीय वायुदलातील ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला पुढील महिन्यात, मे 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) जाणार आहेत. त्यांची निवड अमेरिकेच्या अ‍ॅक्सिओम स्पेसच्या Ax-4 या खासगी अंतराळ मोहिमेसाठी करण्यात आली असल्याची माहिती देशाचे अंतराळ व अणुऊर्जा राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी अधिकृतरित्या जाहीर केली आहे. तर ISROचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांनीदेखील या ऐतिहासिक मोहिमेबद्दल माहिती दिली.

ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे लखनऊ, उत्तर प्रदेश येथे जन्मलेले असून 2006 पासून भारतीय वायुदलात कार्यरत आहेत. त्यांनी रशियातील युरी गागरिन ट्रेनिंग सेंटरमध्ये आणि ISROच्या बंगळुरू येथील केंद्रात विशेष अंतराळ प्रशिक्षण पूर्ण केले आहे. 2019 मध्ये 'गगनयान' मोहिमेसाठी त्यांची निवड झाली होती.

Ax-4 मोहिमे विषयी: Ax-4 ही अ‍ॅक्सिओम स्पेस आणि SpaceX यांची संयुक्त मोहीम आहे. 29 मे 2025 रोजी फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरवरून ही मोहीम SpaceX च्या Falcon 9 रॉकेटद्वारे प्रक्षिप्त केली जाईल. मोहिमेसाठी Crew Dragon हे अंतराळयान वापरण्यात येणार आहे.

या मोहिमेमध्ये कमांडर पेगी व्हिटसन (अमेरिका), पायलट ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला (भारत), मिशन स्पेशालिस्ट स्लावोश उझ्नान्स्की (पोलंड) आणि टिबोर कापू (हंगेरी) हे चार अंतराळवीर सहभागी असतील. या मोहिमेदरम्यान विविध वैज्ञानिक प्रयोग केले जातील, ज्यात सूक्ष्म गुरुत्वाकर्षण, अवकाशात माणसाच्या स्नायू व पेशी यावर होणारे परिणाम, अंतराळामध्ये बीजसंवर्धन व त्याची प्रतिकारशक्ती अशा बाबींचा समावेश अभ्यासाअंतर्गत असणार आहे. भारतातून अंतराळात जाणारे शुभांशू शुक्ला हे दुसरे व्यक्ती असतील. 1984 मध्ये राकेश शर्मा यांनी सोव्हिएत युनियनच्या Soyuz मोहिमेद्वारे भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com