Gujarat ATS Action : गुजरात ATS ची कारवाई! बंगळुरूमधून दहशतवादी प्रचार करणाऱ्या महिलेला अटक
गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) बंगळुरू येथून शमा परवीन अन्सारी या महिलेला अटक केली आहे. शमा परवीन अन्सारी ही अल-कायदा इन इंडियन सबकॉंटिनेंट (AQIS) या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेचा प्रचार करत होती, असा आरोप आहे. अन्सारी ही सोशल मीडियाच्या माध्यमातून भारत सरकारविरोधात द्वेष निर्माण करणारा मजकूर आणि जिहादसारख्या कट्टर विचारांचा प्रसार करत होती. तिच्याकडे दोन फेसबुक पेजेस आणि एक इंस्टाग्राम अकाउंट होते, ज्यावरून ती AQIS तसेच इतर कट्टर विचारधारकांची भाषणं, व्हिडिओ आणि संदेश शेअर करत होती. तिच्या सोशल मीडिया हँडल्सना एकूण 10 हजाराहून अधिक फॉलोअर्स होते. या प्लॅटफॉर्मवर ती सातत्याने सशस्त्र क्रांती आणि जिहादचे आवाहन करणारा मजकूर प्रसारित करत होती.
गुजरात एटीएसच्या तपासात हेही स्पष्ट झाले की, अन्सारीचा पाकिस्तानातील काही व्यक्तींशी फोन आणि ईमेलद्वारे थेट संपर्क होता. तिचा उद्देश मुस्लिम तरुणांना भडकवून देशात धार्मिक तेढ निर्माण करणे आणि दहशतवादी विचारांकडे वळवणे असा होता. या प्रकरणात काही दिवसांपूर्वीच दिल्ली, नोएडा, अहमदाबाद आणि मोडासा येथून चार जणांना अटक करण्यात आली होती. त्यांनी सोशल मीडियावर जिहादी आणि AQIS च्या प्रचाराचे व्हिडिओ पोस्ट केले होते. या चौकशीत मोहम्मद फैयाक या आरोपीने शमा परवीन अन्सारीच्या सोशल मीडिया पेजेसवरून हे व्हिडिओ डाऊनलोड करून पोस्ट केल्याचे समोर आले. त्यानंतर तपास अधिक खोलवर जात असताना अन्सारीचा थेट संबंध उघड झाला.
अन्सारीने AQIS चे माजी प्रमुख मौलाना असीम उमर, मारलेला अल-कायदा नेता अन्वर अल-अवलाकी तसेच पाकिस्तानातील लाहोरच्या लाल मशीदचे मौलाना अब्दुल अझीझ यांचे सरकारविरोधी भाषणांचे व्हिडिओ शेअर केले होते. हे सर्व व्हिडिओ भारतात फूट पाडण्याचे आणि धार्मिक उन्माद भडकवण्याचे प्रयत्न करणारे होते. मंगळवारी बंगळुरूच्या आरटी नगर येथून एटीएसने अन्सारीला अटक केली. ही कारवाई केंद्रीय यंत्रणा आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने पार पडली. बुधवारी तिला ट्रांझिट रिमांडवर गुजरातला आणण्यात आले. तिच्यावर देशद्रोह, दहशतवादाला प्रोत्साहन देणे आणि धार्मिक तेढ वाढवण्याचे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असून AQIS च्या भारतातील नेटवर्कबाबत आणखी माहिती पुढे येण्याची शक्यता आहे.