
बॉलिवूडनगरी मुंबईत पुन्हा एकदा दहशतीची सावली पसरली आहे. जुहू परिसरातील शेट्टी टॉवर येथे राहणारे प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर शनिवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने थेट पाच राउंड गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर अवघ्या काही तासांतच सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आणि बॉलिवूडसह संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला.
या गोळीबाराची जबाबदारी कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या टोळीने स्वीकारल्याचा दावा करण्यात आला आहे. शुभम लोंकर आरजू बिश्नोई नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये थेट रोहित शेट्टी यांना धमकी देण्यात आली आहे.
त्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,“आज मुंबईत शेट्टी टॉवरमध्ये राहणाऱ्या दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार झाला आहे. या हल्ल्याची जबाबदारी शुभम लोंकर आरजू बिश्नोई आणि हरी बॉक्सर हरमन संधू घेत आहे. आम्ही त्याला अनेकदा सांगितलं होतं की आमच्या कामात हस्तक्षेप करू नकोस… पुढच्या वेळी गोळ्या घराबाहेर नाही तर थेट बेडरूममध्ये झाडू.” या धमकीच्या शेवटी “ही संपूर्ण बॉलिवूडसाठी चेतावणी आहे” असे नमूद केल्याने चित्रपटसृष्टीत भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर बाईकवरून जुहू परिसरात आला होता. त्याने रोहित शेट्टी यांच्या इमारतीपासून काही अंतरावर दुचाकी उभी केली आणि नंतर पायी चालत शेट्टी टॉवरकडे गेला. काही क्षणांतच त्याने इमारतीच्या दिशेने सलग पाच गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून पसार झाला. गोळीबाराची माहिती मिळताच जुहू पोलीस आणि गुन्हे शाखेची पथकं तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
लॉरेन्स बिश्नोई टोळीने गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केला असला, तरी या दाव्याला दुजोरा देणारे ठोस पुरावे अद्याप हाती आलेले नाहीत, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सोशल मीडियावरील पोस्ट, कॉल डिटेल्स, आयपी अॅड्रेस आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे.
शेट्टी टॉवर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये संशयित व्यक्ती चालत येताना आणि गोळीबार करताना स्पष्टपणे दिसत आहे. या फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी अभिनेता सलमान खान यांच्या घरावरही बिश्नोई गँगकडून गोळीबार करण्यात आला होता. त्यामुळे दोन्ही प्रकरणांमध्ये एकाच टोळीचा हात आहे का, या दिशेने गुन्हे शाखा सखोल तपास करत आहे.
घटनेनंतर रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानी आणि परिसरात सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार आणि निर्माते हादरले असून, पुन्हा एकदा सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मुंबईत घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे एकच प्रश्न उपस्थित होतो आहे. बॉलिवूड आता थेट गुंडगिरीच्या निशाण्यावर आहे का?