Mumbai Handcarts: मुंबईतून हातगाड्या हद्दपार होणार! बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या वितरीत करण्याचा निर्णय
क्रॉफर्ड मार्केट, काळबादेवी, भुलेश्वर, चिरा बाजार व अन्य परिसरात चालणाऱ्या हातगाड्या हद्दपार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या गाड्यांच्या बदल्यात हातगाडी मालकांना बॅटरीवर चालणाऱ्या हातगाड्या वितरित करण्यात येणार आहेत, त्यामुळे कामगारांचे श्रम कमी होऊन, लवकरात लवकर सामान वाहून नेणे शक्य होणार आहे.
मुंबई शहरात मालवाहतूक करण्यासाठी आजही मोठ्या प्रमाणात हातगाड्यांचा वापर केला जातो. काळबादेवी, मुंबादेवी, भुलेश्वर पायधुनी, चिरा बाजार, चंदनवाडी, क्रॉफर्ड मार्केट आदी मार्केट परिसरात सरासरी 3 हजार 700 पेक्षा जास्त हातगाड्या आहेत. या गाड्या गल्लीबोळात सहज जात असल्यामुळे व्यापारी माल वाहून नेण्यासाठी हातगाड्यांनाच पसंती देतात.
टेम्पोपेक्षा हातगाड्यांचे भाडेही कमी असते. पण मार्केटमधील गर्दीतून हातगाड्या चालवणे कामगारांना त्रासदायक ठरत आहे. मोठ्या प्रमाणात सामान असल्यास ही गाडी ओढताना कामगार हैराण होतात. हातगाडी कामगारांमध्ये बहुतांश माथाडी कामगार आहेत. त्यामुळे या गाड्यांच्या बदल्यात हातगाडी मालकांना बॅटरीवर चालणाऱ्या हातगाड्या वितरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.