BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरेंचा पहिला उमेदवार ठरला?

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरेंचा पहिला उमेदवार ठरला?

मुंबई महापालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापू लागले आहे. एका बाजूला ठाकरे बंधूंची युती जाहीर झाली असून, दुसऱ्या बाजूला भाजप–शिवसेना महायुतीही जोरदार तयारीला लागली आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

मुंबई महापालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापू लागले आहे. एका बाजूला ठाकरे बंधूंची युती जाहीर झाली असून, दुसऱ्या बाजूला भाजप–शिवसेना महायुतीही जोरदार तयारीला लागली आहे. त्यामुळे यंदाची मुंबई महापालिका निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. अशातच मनसेकडून एक महत्त्वाची हालचाल समोर आली असून, राज ठाकरे यांचा मुंबई महापालिकेसाठीचा पहिला उमेदवार जवळपास निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दादर येथील मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १९२ साठी मनसेकडून उमेदवाराबाबत चर्चा झाली आहे. या चर्चेनंतर मनसेचे नेते यशवंत किल्लेदार हे या प्रभागातून निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या पक्षाकडून मुंबई महापालिकेतील पहिली उमेदवारी कोणाला मिळणार, याबाबतची उत्सुकता वाढली आहे. विशेष म्हणजे, २०१७ च्या महापालिका निवडणुकीत याच प्रभागातून ठाकरे गटाच्या प्रीती पाटणकर यांनी विजय मिळवला होता.

दरम्यान, प्रभाग क्रमांक १९२ च्या जागावाटपावरून ठाकरे गटाच्या शिवसेनेत नाराजीचा सूर उमटू लागला आहे. युतीच्या चर्चेत प्रभाग १९२ मनसेला आणि प्रभाग १९४ ठाकरे गटाला देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, प्रभाग १९२ आपल्यालाच मिळावा, अशी मागणी ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. या मागणीसाठी आज सायंकाळी चार वाजता शिवसैनिक उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेणार असल्याचे समजते. माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर हेही शिवसैनिकांसह उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

दरम्यान, आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळख असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील एकूण २९ महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, १६ जानेवारीला निकाल जाहीर होतील. मुंबई महापालिकेचा कार्यकाळ ७ मार्च २०२२ रोजी संपला असून, तेव्हापासून महापालिकेवर प्रशासक नेमण्यात आला आहे. २०१७ मध्ये झालेल्या मागील निवडणुकीत किशोरी पेडणेकर या महापौर होत्या.

मुंबई महापालिका निवडणूक २०२६ : संभाव्य कार्यक्रम

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी संभाव्य कार्यक्रमही समोर आला आहे. त्यानुसार, २३ ते ३० डिसेंबर २०२५ दरम्यान नामांकन दाखल केले जाणार आहेत. ३१ डिसेंबरला छाननी, २ जानेवारी २०२६ पर्यंत नामांकन मागे घेण्याची अंतिम तारीख, ३ जानेवारीला अंतिम उमेदवार यादी आणि चिन्ह वाटप, १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहेत. यामुळे मुंबई महापालिका निवडणूक २०२६ साठी राजकीय रणधुमाळीला आता वेग आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com