Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चासाठी मुंबईत पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तब्बल 450 अधिकारी तैनात
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यात पुन्हा एकदा आंदोलनाची लाट उसळली आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी 27 ऑगस्ट रोजी हजारो समर्थकांसह मुंबईकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली असून 29 ऑगस्टपासून अनिश्चितकालीन आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. तथापि, मुंबई हायकोर्टाने त्यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मनाई केली आहे. नवी मुंबईतील खारघर किंवा अन्य ठिकाणी परवानगी देण्याची मुभा राज्य सरकारला देण्यात आली आहे.
आंतरवली सराटी येथून निघणाऱ्या या मोर्चासाठी राज्यभरातून कार्यकर्त्यांची मोठी जमवाजमव सुरू झाली आहे. रास्त्यावर ठिकठिकाणी आंदोलनकर्त्यांसाठी जेवण व निवासाची व्यवस्था केली जात आहे. साष्ट पिंपलगाव येथे गावकऱ्यांनी खास नाश्त्याची तयारी केली असून गरमागरम पालक पुरी आणि चटणीने कार्यकर्त्यांचे स्वागत होणार आहे. इतर गावांमध्येही अशीच सोय करण्यात आली आहे. दरम्यान, धाराशिव जिल्यातील मराठा समाजाचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहेत.
27 ऑगस्टपासून निघणारा हा मार्च पैठण, शेवगाव, अहमदनगर, आलेफाटा मार्गे शिवनेरी किल्ल्यावर विसावणार असून त्यानंतर मुंबईकडे मार्गक्रमण होईल. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला 26 ऑगस्टपर्यंत आरक्षणाचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरक्षण प्रश्न टाळण्याचा आरोप केला असून सरकारवर गंभीर टीका केली आहे.
मुंबईकडे निघणाऱ्या या मोर्चासाठी पोलिस प्रशासनाने मोठा बंदोबस्त उभारला आहे. 450 अधिकारी-कर्मचारी, दोन एसआरपीएफ कंपन्या, बॉम्ब शोधक पथक आणि ड्रोनच्या माध्यमातून कडेकोट नजर ठेवली जाणार आहे. आता राज्याचे लक्ष 29 ऑगस्टकडे लागले असून, या दिवशी मराठा समाजाचे अनिश्चितकालीन आंदोलन मुंबईच्या रस्त्यांवर किती मोठ्या प्रमाणावर उभे राहते, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.