Weather News : सोमवारपासून जोरदार पावसाचा इशारा, 11 राज्यांना रेड अलर्ट; महाराष्ट्रासाठी महत्वाची बातमी
गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक भागांमध्ये मान्सूनचा जोर काहीसा मंदावलेला दिसत आहे. पावसाची तीव्रता कमी झाल्यामुळे काही ठिकाणी उष्णतेची चाहूल लागली आहे. मात्र, पुढील आठवड्यात हवामानात मोठा बदल होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. स्कायमेट वेदरच्या अहवालानुसार, सोमवारपासून देशभरातील 11 राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही या पावसाचा मोठा प्रभाव दिसू शकतो.
मान्सूनचा वेग मंदावला, पण चिंता नाही
सध्या भारताच्या उत्तर, पश्चिम, मध्य आणि काही दक्षिणेकडील भागांमध्ये मान्सूनचा वेग कमी झाला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, ही एक सामान्य परिस्थिती असून तातडीने चिंता करण्यासारखं काही नाही. मात्र, अशी स्थिती दीर्घकाळ टिकल्यास पिकांवर आणि पाण्याच्या उपलब्धतेवर परिणाम होऊ शकतो. सध्या तरी तसं चित्र नाही, असं तज्ज्ञांचे मत आहे.
कमी दाबाचा पट्टा आणि अतिवृष्टीचा अंदाज
हवामान तज्ज्ञांच्या मते, 12 ऑगस्ट रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. 13 ऑगस्टला हा कमी दाबाचा पट्टा आणखी मजबूत होईल. सध्याची वातावरणीय परिस्थिती या प्रणालीला पूर्णपणे अनुकूल आहे. यामुळे देशभरातील विविध भागांमध्ये पावसाची तीव्रता वाढेल आणि अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
कोणत्या राज्यांना इशारा?
या हवामान बदलाचा परिणाम म्हणून महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या 11 राज्यांना हवामान खात्याने हाय अलर्ट दिला आहे. या राज्यांमध्ये पुढील आठवड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रात काय परिस्थिती असू शकते?
महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ आणि मराठवाडा भागात 13 ते 15 ऑगस्टदरम्यान पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे. शेतीसाठी हा पाऊस लाभदायक असला तरी काही ठिकाणी जलसाठा वाढल्याने नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊ शकते. यामुळे निचांकी भागात पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.