IMD Weather Update : देशात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्राबाबत मोठी बातमी
थोडक्यात
यावर्षी देशभरात पावसानं धुमाकूळ घातला
अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा
पुन्हा एकदा वातावरणामध्ये मोठा बदल
यावर्षी देशभरात पावसानं धुमाकूळ घातला आहे, यंदा देशासह राज्यात वेळेपूर्वीच मान्सून दाखल झाला होता, पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा अधिक राहिलं. अनेक राज्यांना पुराचा मोठा फटका बसला, ज्यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. पावसामुळे महाराष्ट्रात मोठं नुकसान झालं. नद्यांना आलेल्या पुराचा शेतीसह ग्रामीण भागांमध्ये मोठा फटका बसला. दरम्यान आता हळुहळु थंडी वाढू लागली असून, पावसाचं संकट टळलं आहे, असं वाटत असतानाच पुन्हा एकदा वातावरणामध्ये मोठा बदल पहायला मिळत आहे, भारतीय हवामान विभागाकडून 9 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबरपर्यंत अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
देशाच्या विविध भागांमध्ये चार ठिकाणी सायक्लॉनिक सर्क्युलेशन (Cyclonic Circulation) निर्माण झालं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अनेक राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्यानं दिलेल्या नव्या इशाऱ्यानुसार सायक्लॉनिक सर्क्युलेशनमुळे दक्षिण भारतात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. पहिलं सायक्लॉनिक सर्क्युलेशन हे ईस्ट सेंट्रल बे ऑफ बंगालवर निर्माण झालं आहे. तर दुसरं पश्चिम बंगालच्या क्षेत्रामध्ये तिसरं उत्तर तामिळनाडू आणि चौथ सायक्लॉनिक सर्क्युलेशन हरियाणामध्ये सक्रिय आहे.
यामुळे आता पुन्हा एकदा संपूर्ण भारतात वातावरण बदलण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवस तामिळनाडू आणि पुडुचेरीमध्ये काही ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. केरळमध्ये देखील पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. तर इतर भागांमध्ये तापमानात घट होऊन थंडी पडणार आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, दक्षिण हरियाणा आणि महाराष्ट्रात सरासरी तापमान हे दोन ते चार अंश सेल्सिअसने कमी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे राज्यात थंडीचा जोर वाढू शकतो. तर पूर्वोत्तर भारतामध्ये थंडी आणि पाऊस असं दोन्ही वातावरण बघायला मिळू शकतं, अशी माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
