Maharashtra Weather Update
Maharashtra Weather Update

Weather Update : ऐन हिवाळ्यात मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

कडाक्याची थंडी, त्यानंतर दिवसाच्या तापमानात झालेली अचानक वाढ आणि आता ऐन जानेवारी महिन्यात पावसाचा इशारा देण्यात आल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

गेल्या काही महिन्यांपासून देशभरात हवामानात मोठे आणि अनपेक्षित बदल जाणवत आहेत. कडाक्याची थंडी, त्यानंतर दिवसाच्या तापमानात झालेली अचानक वाढ आणि आता ऐन जानेवारी महिन्यात पावसाचा इशारा देण्यात आल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. विशेषतः उत्तर प्रदेशातील हवामान झपाट्याने बदलत असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, एक सक्रिय पश्चिमी विक्षोभ उत्तर भारतावर प्रभाव टाकत असून, त्यामुळे २२ जानेवारीच्या संध्याकाळी किंवा रात्री पश्चिम उत्तर प्रदेशात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. हा पावसाचा पट्टा हळूहळू पुढे सरकत २३ जानेवारी रोजी पूर्व आणि मध्य उत्तर प्रदेशात व्यापक पावसाचे रूप घेऊ शकतो. २४ जानेवारी रोजी पावसाचे प्रमाण काहीसे कमी होईल, तर २५ जानेवारीपासून हवामान कोरडे होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, पश्चिम उत्तर प्रदेशच्या काही भागात गारपीट होण्याचीही शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ५० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २२ ते २४ जानेवारीदरम्यान राज्यातील किमान तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, पुढील पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे २६ जानेवारीपासून पुन्हा एकदा पावसाचा नवा टप्पा सुरू होण्याचा अंदाज आहे. हा पाऊस २७ जानेवारीपर्यंत पूर्व उत्तर प्रदेशात पोहोचेल आणि पुढील एक-दोन दिवस पावसाची तीव्रता वाढू शकते.

या बदलत्या हवामान परिस्थितीमुळे काही भागांमध्ये थंडीची लाट परत येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जोरदार वारे, ढगाळ वातावरण आणि पावसामुळे तापमानात पुन्हा घसरण होऊ शकते. दरम्यान, आयएमडीच्या ताज्या अंदाजानुसार उत्तर प्रदेशसह देशातील तब्बल नऊ राज्यांमध्ये २२ ते २५ जानेवारीदरम्यान मुसळधार पाऊस आणि वादळी हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश दिले असून, नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com