Kohlapur : सलग दुसऱ्या दिवशी मान्सूनपूर्व पावसाचा जिल्ह्यात प्रभाव; राजाराम बंधारा पाणीपातळी 16 फूट 9 इंचांवर
कोल्हापूर जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे राजाराम बंधारा पाण्याखाली गेला असून, कसबा बावडा ते वडणगे दरम्यानचा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. राजाराम बंधारा पाणीपातळी 16 फूट 9 इंचांवर आली आहे. सुरक्षिततेसाठी या मार्गावर प्रशासनाने बॅरिकेड्स लावले आहेत. विशेष म्हणजे, यंदा मे महिन्यातच बंधारा पाण्याखाली गेला आहे, ही एक चिंताजनक बाब आहे.
या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीस आलेल्या पिकांना फटका बसला असून, मशागतीची कामे ठप्प झाली आहेत. दरवर्षी मेच्या अखेरीस शेतकरी बांधव नांगरणी, बांधबंदिस्ती आणि बी-बियाण्यांची तयारी करण्यात गुंतलेले असतात. यंदाही वळीव पावसानंतर शेतकरी खरिपाच्या तयारीत होते. मात्र सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ही तयारी खोळंबली आहे.
बियाणे व खत विक्रीही थांबली
सध्या हवामानात अनिश्चितता असल्याने बियाणे व खतांची विक्रीही मंदावली आहे. पावसाचे प्रमाण कधी कमी होईल आणि शेतकरी मशागत सुरू करू शकतील, याची प्रतीक्षा सध्या सुरू आहे.