Weather News : गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका; राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा, 'या' जिल्ह्यांना अलर्ट
थोडक्यात
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
72 तासांसाठी राज्यातील अनेक भागांना हायअलर्ट
'या' जिल्ह्यांना अलर्ट
महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील 72 तासांसाठी राज्यातील अनेक भागांना हाय अलर्ट देण्यात आला असून मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट यासह पावसाचा अंदाज असल्यामुळे नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
अंदाजानुसार पुढील 24 तासांत सातारा व सांगली जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे, तर कोल्हापूरमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. सोलापूरमध्येही पावसाचा जोर राहील. पुणे जिल्ह्यासाठी आज यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट लागू राहणार आहे. घाटमाथ्याच्या भागात पावसाची तीव्रता अधिक असेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
सोलापूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सतत पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. साखर पेठ, मंगळवार बाजार आणि गणेश शॉपिंग सेंटर परिसर जलमय झाले आहेत. धरणांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. धाराशिव जिल्ह्यातही पुन्हा एकदा विजांच्या गडगडाटासह पावसाने जोर धरला असून, तुळजापूर व येरमाळा परिसरात शेतकऱ्यांच्या पिकांना मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील चार दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहील आणि ठिकठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळेल. नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घेऊन केवळ अत्यावश्यक काम असल्यासच बाहेर पडावे, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.