Raj Thackeray on Hindi Language: हिंदी भाषेचा वाद वाढणार; राज ठाकरेंचं थेट शिक्षणमंत्र्यांना पत्र

Raj Thackeray on Hindi Language: हिंदी भाषेचा वाद वाढणार; राज ठाकरेंचं थेट शिक्षणमंत्र्यांना पत्र

राज ठाकरे: हिंदी भाषेच्या सक्तीवर सरकार गोंधळात, लेखी आदेशाची मागणी
Published by :
Riddhi Vanne
Published on

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना हिंदी भाषेच्या संदर्भात झालेल्या वादाच्या पार्श्वभुमीवर पत्र लिहीलं आहे. या पत्रामधून त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. या पत्रात त्यांनी इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या सक्तीवरून सरकार गोंधळ घालत असल्याचा सनसनाटी आरोप केला आहे. तसेच, दोन भाषा शिकवण्याच्या निर्णयाचा लेखी आदेश लवकर काढावा, अन्यथा मनसे आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे. आता सरकार यावर काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे आहे. मात्र, मनसेचा विरोध कायम आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.

गेले दोन महिने महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्यावरून मोठा वाद सुरू आहे. सरकारने सुरुवातीला तीन भाषा शिकवण्याचा निर्णय घेतला. त्यात हिंदी भाषा सक्तीची असेल, असे म्हटले होते. मनसेने याला विरोध केला. लोकांच्या भावना तीव्र होत्या मनसेच्या विरोधामुळे जनभावना तयार झाली. जनसामान्यांमध्ये याबाबत रोष निर्माण झाला त्यामुळे सरकारने हिंदी भाषेची सक्ती नसेल, असे जाहीर केले. राज ठाकरे म्हणतात, "हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. ती इतर राज्यांतील भाषांसारखीच आहे. मग ती शिकण्याची सक्ती का केली जात होती? सरकार दबावाखाली का वागत होते, हे माहित नाही." त्यांनी असा प्रश्न विचारला की, मुलांना पहिल्या इयत्तेपासून तीन भाषा का शिकवायच्या? त्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी पहिलीपासून दोनच भाषा शिकवल्या जातील, असे सांगितले. पण याचा लेखी आदेश अजून आलेला नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी शंका व्यक्त केली आहे. आपले सरकार कोणत्या तरी दबावाखाली काम करते आहे का असा सवाल मनसेकडून होत आहे.

राज ठाकरे म्हणतात, "माझ्या महाराष्ट्र सैनिकांना माहिती आहे की, आधीच्या निर्णयानुसार हिंदी भाषेच्या पुस्तकांची छपाई सुरू झाली आहे. आता पुस्तकं छापली गेली आहेत, मग सरकार आता आपला निर्णय बदलणार आहे का? असा सरकारचा काही डाव तर नाही ना?"असं काही नसेल असं मी मानतो. पण असं काही झालं, तर मनसे जे आंदोलन उभं करेल, त्याला सरकार जबाबदार असेल.": देशातील अनेक राज्यांनी हिंदी भाषेची सक्ती नाकारली आहे. कारण त्या राज्यांनी त्यांच्या राज्याच्या भाषेची अस्मिता जपली आहे."मंत्री महोदय, आपण आपले सहकारी मंत्रिमंडळ हे देखील जन्माने मराठी आहात, आपण इतर राज्याप्रमाणे हिंदीला विरोध का करत नाही? आणि आपल्या भाषेची अस्मिता कधी आणि कशी जोपासणार आहोत ?" इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र सरकार सुद्धा आता आपल्या भाषेबद्दलची अस्मिता दाखवेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान पहिलीपासून दोनच भाषा शिकवल्या जातील याबाबत चा लेखी निर्णय लवकरात लवकर जारी करावा अन्यथा मनसे कडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या पत्राद्वारे राज ठाकरे यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांना दिला आहे'.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com