हिंगणघाट बाजार समितीच्या सभापतीकडून शेतकऱ्याला मारहाण

हिंगणघाट बाजार समितीच्या सभापतीकडून शेतकऱ्याला मारहाण

चणा खरेदी अचानक बंद झाल्याने शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या अडचणीदरम्यान हा प्रकार घडला आहे.
Published by :
Sudhir Kakde

वर्धा | भूपेश बारंगे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी यांच्याकडून शेतकऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. वर्ध्याच्या हिंगणघाट  कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना धक्काबुक्की करीत कॉलर पकडून मारहाण करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. हिंगणघाटच्या कृषी उत्पन्न बाजार समिती येथील हा प्रकार असून नाफेडची चणा खरेदी अचानक बंद झाल्याने शेतकऱयांनी उपस्थित केलेल्या अडचणीदरम्यान हा प्रकार घडला आहे.

शनिवारी हिंगणघाट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडच्या चण्याची खरेदी सुरू होती. त्यामध्ये आजचा खरेदीचा कोटा पूर्ण झाला. दरोडा येथील शेतकरी सुभाष रेवतकर हे चना घेऊन नाफेडच्या पट्टीवर हजर झाले होते. यावेळी बाजार समिती प्रशासनाकडून आजचा खरेदीचा कोटा पूर्ण झाला असं शेतकऱ्यांना सांगण्यात आलं. किमान आणलेला चणा तरी बाजार समितीमध्ये ठेऊन घ्यावा असा आग्रह शेतकऱ्यांनी धरला होता. पण प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी सभापतिकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी यांना अधिकची माहिती विचारण्यासाठी शेतकरी गेले. यावर बाजार समितीचे सभापती व शेतकरी या दोघांमध्ये बाचाबाची झाली असल्याचं शेतकऱ्यांनी सांगीतलं आहे. त्यानंतर शेतकरी मोबाईल मध्ये विडिओ शूट करत असल्याचं लक्षात येताच शेतकऱ्याचा मोबाईल हिसकावून घेतला आणि मारहाण केली असा आरोप शेतकऱ्याकडून करण्यात आला आहे. या घटनेमुळे शेतकरी संतप्त झाले आहे.

दारोड्याचे शेतकरी सुभाष रेवतकर यांनी घटनेबद्दल माहिती दिली. चणा खरेदी साठी आपला नंबर लागला. तसा पोर्टलवरून संदेश देखील आला. गेल्या तीन दिवसांपासून चणा विक्री साठी बाजार समितीमध्ये येत आहे. आज अचानक चार वाजता चणा खरेदी ठप्प झाली. विचारणा केल्यावर टार्गेट पूर्ण झाल्याचं सांगण्यात आलं. त्यावर सभापतींना विचारल्यावर वाद झाला. आपला मोबाईल हिसकावून घेत कॉलर पकडून मारहाण देखील केली असल्याचं सुभाष रेवतकर यांनी सांगितलं.

सुधीर कोठारी काय म्हणाले?

आज शेवटचा चना खरेदीचा नाफेडचा दिवस होता. जास्तीच्या कोठ्यासाठी प्रयत्नशील होतो. जास्तीचा कोठा आम्हाला मिळाला. पोर्टल सुरू व्हायचं होतं. तितक्यात एक व्यक्ती आला आणि माझ्याशी बोल्ला. त्याला सांगतोय की तुझ्याशी नंतर बोलतो, मी पोर्टल सुरू करण्याच्या कामात आहे, मला पोर्टल सुरू करू दे, मुंबईला बोलत आहो असं सांगितलं असता तो माझ्याशी वाद करत होता. ही त्याची सवय जुनी आहे. कॉटन मार्केटमध्येही त्याने असाच वाद केला होता. त्यांनी जे आता आरोप लावले आहे की, मला मारहाण केली हे अत्यंत चुकीचे आहे. स्वतःचे दोष आहे ते लपवण्यासाठी तो दुसऱ्यावर आरोप करत आहे ही वास्तविकता आहे. असा कोणताच प्रकार बाजार समिती मध्ये झाला नाही असं हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com