Sudan : सुदानमध्ये भीषण नरसंहार
Sudan : सुदानमध्ये भीषण नरसंहारSudan : सुदानमध्ये भीषण नरसंहार

Sudan : सुदानमध्ये भीषण नरसंहार; एल फाशर शहरात हजारो नागरिकांची हत्या

पश्चिम दारफूरमधील एल फाशर (El Fasher) हे महत्त्वाचे शहर रॅपिड सपोर्ट फोर्सेस (RSF) या अर्धसैनिक दलाच्या ताब्यात गेल्यानंतर मोठ्या प्रमाणावर नागरिकांची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

सुदानमधील गृहयुद्धाने अत्यंत गंभीर वळण घेतले आहे. पश्चिम दारफूरमधील एल फाशर (El Fasher) हे महत्त्वाचे शहर रॅपिड सपोर्ट फोर्सेस (RSF) या अर्धसैनिक दलाच्या ताब्यात गेल्यानंतर मोठ्या प्रमाणावर नागरिकांची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. संयुक्त राष्ट्रसंघ आणि स्थानिक संस्थांच्या अहवालानुसार, RSF दलाने शहरात घरे जाळली, नागरिकांना ठार मारले आणि हजारो लोकांना पलायन करावे लागले. गेल्या दीड वर्षांपासून या शहराला वेढा घालण्यात आला होता, आणि शहर पडल्यानंतर RSF च्या सैनिकांनी नागरिकांवर हल्ले चढवले.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या आफ्रिका विषयक सहाय्यक महासचिव मार्था आमा अक्या पोबी यांनी सांगितले की, “एल फाशर आणि आसपासच्या भागात नागरिकांसाठी कोणताही सुरक्षित मार्ग उपलब्ध नाही.” त्या म्हणाल्या, “या भागात मोठ्या प्रमाणावर नरसंहार, जबरदस्तीने हत्या आणि स्त्रियांवरील अत्याचार होत आहेत.” Sudan Doctors Network च्या मते, या हल्ल्यात आतापर्यंत सुमारे १,५०० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच १५,००० हून अधिक लोकांनी शहर सोडून तविला या भागात आश्रय घेतला आहे.

मानवाधिकार संस्थांनी सांगितले की, RSF सैनिकांनी घराघरांत घुसून नागरिकांना बाहेर ओढून ठार मारले. काही व्हिडिओंमध्ये निःशस्त्र पुरुषांना गोळ्या घालण्याचे दृश्य दिसत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने या घटनेचा तीव्र निषेध केला असून, सुदानमधील परिस्थिती “अत्यंत धोकादायक” असल्याचे म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने तत्काळ युद्धविराम आणि नागरिकांच्या संरक्षणाची मागणी केली आहे. सुदानमध्ये गेल्या तीन वर्षांपासून RSF आणि सुदानी सैन्य (SAF) यांच्यात गृहयुद्ध सुरू आहे. दोन्ही पक्षांवर युद्धगुन्ह्यांचे आरोप असून, एल फाशरमधील हत्याकांडाने देश पुन्हा एकदा भीषण मानवी संकटात ढकलला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com