Jayant Patil :  ‘एअरस्ट्रीप सोडून विमान कसे गेले?’, अजित पवार विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल

Jayant Patil : ‘एअरस्ट्रीप सोडून विमान कसे गेले?’, अजित पवार विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली निधन संपूर्ण राज्यासाठी वेदनादायी ठरले आहे. २८ जानेवारीच्या पहाटेच ही धक्कादायक बातमी समोर आली
Published by :
Varsha Bhasmare
Published on

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली निधन संपूर्ण राज्यासाठी वेदनादायी ठरले आहे. २८ जानेवारीच्या पहाटेच ही धक्कादायक बातमी समोर आली आणि बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. अजित पवार यांच्या विमान अपघाताने केवळ राजकीयच नव्हे, तर सामाजिक क्षेत्रातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या दुर्दैवी घटनेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत.

‘विमान एअरस्ट्रीप सोडून कसे गेले?’

जयंत पाटील यांनी अपघाताच्या कारणांबाबत शंका उपस्थित केली आहे. “विमान एअरस्ट्रीप सोडून कसे गेले, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे,” असे ते म्हणाले. या अपघातामागे तांत्रिक बिघाड होता का, याची माहिती ब्लॅक बॉक्समधून समोर येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. बारामतीची एअरस्ट्रीप उंच असून भराव करून तिचे एक्स्टेन्शन करण्यात आले आहे. त्यामुळे लँडिंगवेळी पायलटचा अंदाज चुकला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे जयंत पाटील यांनी नमूद केले.

त्यांनी पुढे सांगितले की, अपघाताच्या वेळी धुके नव्हते. विशेष म्हणजे याच विमानातून अजित पवार यांनी आदल्या दिवशीही प्रवास केला होता. त्यामुळे वैमानिकासाठी ही एअरस्ट्रीप नवीन नव्हती, असेही त्यांनी अधोरेखित केले. या घटनेत कोणताही घातपात नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले असून, त्यामुळे या दु:खद घटनेचे राजकारण करू नये, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

पुन्हा एकसंघ होण्याची दादांची इच्छा

जयंत पाटील यांनी अजित पवारांच्या व्यक्तिमत्त्वावरही भाष्य केले. “अजित दादांमध्ये विलक्षण जिद्द होती, ते प्रचंड मेहनत घ्यायचे,” असे सांगत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. अलिकडच्या काळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येऊन निवडणुका लढवाव्यात, याबाबत चर्चा सुरू होती. “दोन्ही पक्ष पुन्हा एकसंघ व्हावेत, ही दादांची मनापासून इच्छा होती. त्यासाठी काही बैठकाही नुकत्याच झाल्या होत्या,” अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

त्यांनी पुढे सांगितले की, अनेक वैयक्तिक प्रसंग असे आहेत जे कधीही विसरता येणार नाहीत. “माझ्या वेषभूषेबद्दल ते नेहमी मिश्किल टिप्पणी करायचे,” असे सांगत त्यांनी भावनिक आठवण शेअर केली. शेवटी, खासगी विमानांच्या सुरक्षेबाबत कडक प्रोटोकॉल आणि तपासणी झाली पाहिजे, असे सांगत त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की या अपघातात घातपात दिसत नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com