Republic Day India : प्रजासत्ताक दिनाचा चीफ गेस्टची निवड कशी केली जाते ? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी यंदा कोण प्रमुख पाहुणे असणार, यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. युरोपियन युनियनचे (EU) वरिष्ठ नेते यंदा भारताच्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे चीफ गेस्ट असणार आहेत. यामध्ये युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन यांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या निर्णयाकडे भारत आणि युरोपियन युनियनमधील धोरणात्मक, राजकीय आणि आर्थिक संबंध अधिक बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
अँटोनियो कोस्टा आणि उर्सुला वॉन डेर लेयेन हे २५ ते २७ जानेवारी २०२६ दरम्यान तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असतील. या दौऱ्यात ते भारत–EU शिखर परिषदेत सहभागी होतील, प्रजासत्ताक दिनाशी संबंधित विविध कार्यक्रमांना उपस्थित राहतील आणि भारताच्या वरिष्ठ नेतृत्वासोबत महत्त्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा करतील.
भारतामध्ये प्रजासत्ताक दिनासाठी परदेशी प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित करण्याची परंपरा १९५० पासून सुरू आहे. देशाचा पहिला प्रजासत्ताक दिन साजरा झाल्यापासून ही परंपरा अखंड सुरू असून, प्रजासत्ताक दिनाचा चीफ गेस्ट होणे हा कोणत्याही देशाच्या किंवा आंतरराष्ट्रीय संघटनेच्या नेत्यासाठी अत्यंत सन्मानाचा विषय मानला जातो.
चीफ गेस्टची निवड कशी होते?
प्रजासत्ताक दिनासाठी चीफ गेस्ट निवडण्याची प्रक्रिया मुख्य कार्यक्रमाच्या सुमारे सहा महिने आधी सुरू होते. ही प्रक्रिया अत्यंत गोपनीय आणि विचारपूर्वक पार पाडली जाते. भारताचे माजी राजदूत मानबीर सिंग यांच्या मते, चीफ गेस्ट निवडताना अनेक महत्त्वाच्या बाबींचा सखोल विचार केला जातो.
यामध्ये संबंधित देश किंवा संघटनेचे भारताशी असलेले राजनैतिक संबंध, राजकीय, लष्करी आणि आर्थिक सहकार्य, जागतिक स्तरावर त्या देशाचे किंवा नेत्याचे महत्त्व, तसेच भारताच्या परराष्ट्र धोरणातील प्राधान्यक्रम या सर्व घटकांचा समावेश असतो. या सर्व बाबींचा अभ्यास करून परराष्ट्र मंत्रालय अंतिम शिफारस करते आणि त्यानंतर चीफ गेस्टच्या नावावर शिक्कामोर्तब केला जातो.
चीफ गेस्टला मिळणारा मान-सन्मान प्रजासत्ताक दिनाच्या संपूर्ण सोहळ्यात चीफ गेस्टला विशेष सन्मान दिला जातो. त्यांना २१ तोफांची सलामी दिली जाते आणि राष्ट्रपती भवनात गार्ड ऑफ ऑनर देऊन गौरवण्यात येते. तीन दिवसांच्या दौऱ्यात राष्ट्रपतींकडून विशेष स्वागत समारंभ आयोजित केला जातो. याशिवाय, चीफ गेस्ट राष्ट्रपिता महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राजघाटावर भेट देतात. पंतप्रधान त्यांच्या सन्मानार्थ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करतात, ज्यामध्ये परराष्ट्र मंत्री, उपराष्ट्रपती तसेच वरिष्ठ मंत्री आणि अधिकारी उपस्थित राहतात. यंदा युरोपियन युनियनच्या नेतृत्वाला हा सन्मान देण्यात आल्याने भारत–EU संबंध नव्या टप्प्यावर जाण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.
