BMCElections : मुंबई महापालिकेत मराठी नगरसेवक किती? गुजराती, साऊथ इंडियन आणि उत्तर भारतीयांची संख्या काय?
मुंबई महापालिकेच्या अत्यंत चुरशीच्या आणि बहुचर्चित निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला असून, या निकालाने मुंबईच्या राजकारणात मोठे चित्र स्पष्ट केले आहे. या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भाजपने ८९ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला असून, शिवसेनेला २९ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे महायुतीकडे एकूण ११८ जागा जमा झाल्या आहेत. दुसरीकडे, ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखालील गटाला ७१ जागा मिळाल्या असून काँग्रेसला २४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. इतर पक्ष आणि अपक्षांनी मिळून १२ जागा पटकावल्या आहेत. या निकालामुळे आगामी महापौर निवडणूक आणि सत्तास्थापन याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
मराठी अस्मिता केंद्रस्थानी
या निवडणुकीत मराठी अस्मिता आणि हिंदी भाषेचा मुद्दा प्रचारादरम्यान सातत्याने चर्चेत राहिला. ‘मुंबई कोणाची?’ हा प्रश्न अनेक सभांमध्ये उपस्थित करण्यात आला. याचा परिणाम निकालावरही दिसून आला असून, मोठ्या संख्येने मराठी उमेदवार विजयी झाले आहेत. तेजस्वी घोसाळकर, प्रकाश दरेकर, मंगेश पांगारे, संजय घाडी, दीक्षा कारकर, गणेश खणकर, योगिता पाटील, अदिती खुरसुंगे, सारिका झोरे, सीमा शिंदे, श्वेता कोपरगावकर, शिल्पा सांगोरे, मिलिंद शिंदे, पूजा महाडेश्वर, किशोरी पेडणेकर, यामिनी जाधव, मिलिंद वैद्य, स्नेहल तेंडुलकर यांसारख्या अनेक नावांचा यात समावेश आहे. विशेष म्हणजे महिला मराठी उमेदवारांचे प्रतिनिधित्व यावेळी लक्षणीय प्रमाणात वाढले आहे.
गुजराती समाजाची ठळक उपस्थिती
मुंबईतील व्यापारी आणि मध्यमवर्गीय भागांमध्ये गुजराती समाजाचे प्रतिनिधित्व यावेळीही ठळक राहिले. जितेंद्र पटेल, नील सोमय्या, संदीप पटेल, हिमांशु पारेख, धवल वोरा, हर्ष पटेल, केशर पटेल, रोहन राठोड, गौरंग झवेरी, आकाश पुरोहित, रिटा मकवाना यांसारख्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेतील आर्थिक व व्यापारी दृष्टिकोनातून निर्णय प्रक्रियेत गुजराती नेतृत्वाची भूमिका कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हिंदी / उत्तर भारतीय मतदारांचा प्रभाव
हिंदी भाषिक आणि उत्तर भारतीय समाजानेही काही प्रभागांमध्ये आपली ताकद दाखवून दिली आहे. रेखा यादव, राणी द्विवेदी, शिवकुमार झा, स्वाती जयस्वाल, ममता यादव, योगेश वर्मा, सिद्धार्थ शर्मा, दिव्या सिंह, सुधा सिंह यांसारख्या उमेदवारांनी विजय मिळवत आपले स्थान पक्के केले आहे.
मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व
मुंबईतील बहुसंख्य प्रभागांमध्ये मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्वही महत्त्वाचे ठरले आहे. कमरजहों सिद्दिकी, हैदर अली शेख, रफिक शेख, जिशान मुल्तानी, सबा हारून खान, आयेशा खान, रेहबर खान, शबाना शेख, जमीर कुरेशी, आमीर खान, समन आझमी यांसारख्या उमेदवारांनी निवडणूक जिंकली आहे. यामुळे मुंबई महापालिकेचा बहुसांस्कृतिक चेहरा पुन्हा अधोरेखित झाला आहे.
दाक्षिणात्य व मिश्र समाजाचे योगदान
दाक्षिणात्य आणि मिश्र समाजातील उमेदवारांमध्ये शिवानंद शेट्टी, निशा बंगेरा, तेजिंदरसिंग तिवाना, श्रीकला पिल्ले, कॅरन डिमेलो, जोसेफ कोळी, भास्कर शेट्टी यांचा समावेश आहे. त्यामुळे मुंबई महापालिका ही विविध भाषिक आणि सांस्कृतिक समूहांचे प्रतिनिधित्व करणारी संस्था असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.
