मी एमआयडीसीचा मंत्री, कोणी जादुगर नाही- उदय सामंत
निसार शेख|चिपळूण: लोटेतील गोशाळा प्रकरणी उद्योग मंत्रालय योग्य प्रक्रिया राबवत गोशाळा प्रमुख भगवान कोकरे यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. असे असतानाच कोकरे मात्र उठसूठ महिना, २ महिन्यांनी करत असलेले उपोषण योग्य नाही, अशा शब्दात पालकमंत्री उदय सामंत यांनी गेल्या काही दिवसापासून उपोषणाला बसलेल्या कोकरे यांना फटकारले आहे.
गोशाळेंच्या जागेचा प्रश्न सोडवा, उर्वरित २५ लाख रूपयांचे अनुदान तत्काळ द्या, या मागणीसाठी गोशाळेतच उपोषणाला बसलेले कोकरे यांनी शुक्रवारी उपोषण सुरूच ठेवले आहे. मात्र या उपोषणाकडे पशुसंवर्धन विभाग वगळता उर्वरित प्रशासकीय यंत्रणेने पाठ फिरवली आहे. कोकरे यांची प्रकृती अस्वस्थ असून सध्या ते सलाईनवर आहेत. मात्र ते रूग्णालयात जाऊन उपचार घेण्यास नकार देत आहेत.
दरम्यान, कोकरे यांच्या उपोषणासंदर्भात मंडणगड येथे पत्रकारांनी पालकमंत्री सामंत यांना प्रश्न उपस्थित केला असता ते म्हणाले की, गोमातेचा कोकरे जसा आदर करतात तसा आम्हीही करतो. त्यांच्या मागणीचा आम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करत आहोत. मी ही एमआयडीसीचा मंत्री आहे. कोणी जादुगर नाही. जादुगर असतो तर काडी फिरवली असती व बिल्डींग तयार केली असती. त्यांनीही समजून घेतले पाहिजे.शासनाच्या एमआयडीसी विभागाची काही औपचारिकता असते. कागदपत्रे तयार करावी लागतात. ती पूर्ण झाल्यावर कोकरे यांना योग्य तो न्याय मिळेल. मात्र त्यासाठी सारखे उपोषण करणे योग्य नसल्याचे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.