Rupali Thombare Patil : मला खुलासा करण्यासाठी 7 दिवसांचा वेळ, रुपाली ठोंबरे केलं स्पष्ट
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्या रूपाली ठोंबरे यांनी त्यांच्या विरोधात सुरू असलेल्या वादावर मोठं स्पष्टीकरण दिलं आहे. “मला पक्षाची शिस्तभंगाची नोटीस मिळालेली नाही. मात्र, खुलासा पत्र काल रात्री मला देण्यात आलं आहे,” असं त्यांनी सांगितलं. रूपाली चाकणकर यांच्याबाबत माध्यमांमध्ये केलेल्या वक्तव्यासंदर्भात पक्षाने माझ्याकडून खुलासा मागवला आहे, असं ठोंबरे यांनी स्पष्ट केलं. त्या म्हणाल्या, “मी कायदेशीर पद्धतीने खुलासा सादर करणार असून माझा बचाव आणि सत्य मी या खुलास्यातून मांडणार आहे. माधवी खंडाळकर यांनी कुणाला कॉल केले याचे सीडीआर रेकॉर्ड मी काढणार आहे. हा वाद पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर सुरुवातीला संपुष्टात आला होता, मात्र नंतर पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे, CP (पुणे पोलीस आयुक्त) यांना तक्रार दिल्यानंतरही पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला. आधी तक्रारी मागे घेण्यात आल्या आणि नंतर गुन्हा दाखल का करण्यात आला, याचं स्पष्टीकरण मिळायला हवं.”
रूपाली ठोंबरे यांनी पुढे सांगितले, “मीदेखील माधवी खंडाळकर यांच्या विरोधात कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्या आज अजित पवारांना भेटल्या... कुणीही त्यांना भेटू शकतं, पण माधवी खंडाळकर यांनी माझ्याविरोधात दाखल केलेला गुन्हा कुणाच्या सांगण्यावरून करण्यात आला, याचा तपास व्हावा, अशी मी CP यांना विनंती केली आहे.” त्या पुढे म्हणाल्या, “मी त्यांच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागितला आहे. पक्ष आणि आयोग हे पूर्णतः वेगळे आहेत. या आधीही सोशल मीडियावर माझ्याविरोधात पोस्ट करण्यात आल्या होत्या, त्या पोस्ट करणारी मुलगी सुद्धा रूपाली चाकणकर यांच्या गटातीलच होती. तिचं नाव स्नेहल चव्हाण आहे. या सर्व पुराव्यांसह मी सुनील तटकरे आणि अजित पवार यांना माहिती दिली आहे.”
रूपाली ठोंबरे यांनी आणखी खुलासा करताना सांगितले की, “माझ्या खुलासा पत्रात मी सर्व पुरावे सादर करणार आहे. माधवी खंडाळकर त्या वादग्रस्त व्हिडिओमध्ये स्वतःच ‘रूपाली चाकणकर यांना फोन लावा’ असं म्हणताना दिसतात. मग त्या प्रकरणात रूपाली चाकणकर यांचा संबंध नसताना त्यांना का फोन लावला, हा प्रश्न उपस्थित होतो.” या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये अंतर्गत कलह उफाळून आला आहे. ठोंबरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “मी कायद्याच्या चौकटीत राहून माझं सत्य सिद्ध करणार आहे आणि माझ्या विरोधात केलेल्या राजकीय डावांचा पर्दाफाश करणार आहे.”

