Ajit Pawar lokshahi Marathi Exclusive : “अजित दादांची शपथ घेऊन सांगतो...” विलिनीकरणाबाबत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचे मोठं वक्तव्य
मुख्यमंत्री फडणवीसांच्या विधानावर शशिकांत शिंदेंचा थेट पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी लोकशाही मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत थेट आणि तडफदार प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “राष्ट्रवादीचे निर्णय राष्ट्रवादीच घेते” असे म्हणत अजित पवारांनी कोणतीही चर्चा न करता विलिनीकरणाचा निर्णय घेतला नसता, असे विधान केले होते. मात्र, या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, विलिनीकरणावर चर्चा आधीच झाली होती आणि ती अत्यंत जबाबदारीने झाली होती.
“अजित दादांची शपथ घेऊन सांगतो,मी खोटं बोलत नाही”
लोकशाही मराठीशी बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले, “मी अजित दादांची शपथ घेऊन सांगतो, मी जे बोलतोय ते खरं आहे. गेलेल्या माणसाची खोटी शपथ मी कधीच घेणार नाही. विलिनीकरणाबाबत चर्चा झाली होती. त्या चर्चेत मी स्वतः होतो, जयंत पाटील साहेब होते, सुप्रिया ताई होत्या.” शिंदे यांनी हेही स्पष्ट केले की, त्या चर्चेदरम्यान अजित पवारांनी आपण पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा केल्याचे सांगितले होते. “आम्ही विचारलं होतं, वरिष्ठांशी चर्चा झाली का? तेव्हा अजित दादा म्हणाले होते, ‘मी वरिष्ठांशी चर्चा केली आहे, निर्णय मी घेणार आहे आणि सगळे माझ्या पाठीशी राहतील.’”
“मुख्यमंत्र्यांनी हे विधान आजच का केलं?” शिंदेंचा सवाल
मुख्यमंत्री फडणवीसांनी हे वक्तव्य आजच का केलं, असा थेट प्रश्न उपस्थित करत शशिकांत शिंदे म्हणाले, “एखादी व्यक्ती जाऊन चार दिवसही झालेले नाहीत आणि त्यावर इतकं राजकारण करणं योग्य नाही. महाराष्ट्र भावनिक आहे, इथली जनता सुज्ञ आहे. सहानुभूतीच्या लाटेची भीती काही लोकांना वाटत असावी.”
“दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत होत्या, भाजपला हीच भीती”
शिंदे यांनी पुढे मोठा दावा करत सांगितले की, “जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आम्ही एकत्र लढत होतो. घड्याळ या चिन्हावर आम्ही लढत होतो, हे सगळ्यांना माहीत होतं. हीच गोष्ट भाजपला खटकतेय.”
“शरद पवारच खरा योद्धा”
या मुलाखतीत शशिकांत शिंदे यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वावरही ठाम विश्वास व्यक्त केला. “दोन्ही पक्षातल्या नेत्यांना खरं उभं करणारा नेता शरद पवार आहे. शरद पवारांसारखं नेतृत्व अजूनही मैदानात टणक उभं आहे, हा संदेश त्यांनी बारामतीतून दिला आहे.”
राजकीय वर्तुळात खळबळ
लोकशाही मराठीला दिलेल्या या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला नवं वळण मिळालं आहे. आता नेमकं सत्य कुणाचं, हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेसमोर उभा राहिला आहे. ही संपूर्ण माहिती आणि प्रतिक्रिया फक्त लोकशाही मराठीकडेच.

