Manoj Jarange Mumbai Morcha : "हटणार नाही, इथेच उपोषण करून मेलो तरीही..."
Manoj Jarange Mumbai Morcha : "हटणार नाही, इथेच उपोषण करून मेलो तरीही..." Manoj Jarange Mumbai Morcha : "हटणार नाही, इथेच उपोषण करून मेलो तरीही..."

Manoj Jarange Mumbai Morcha : "हटणार नाही, इथेच उपोषण करून मेलो तरीही..." ; आझाद मैदानावर मनोज जरांगेंची गर्जना

मनोज जरांगे: आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी निर्धार, 'हटणार नाही, इथेच उपोषण करून मेलो तरीही...'
Published by :
Team Lokshahi
Published on

मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी आझाद मैदान गाठलं आहे. मानखुर्द आणि चेंबूरमध्ये झालेल्या भव्य स्वागतानंतर हजारोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाले. शेकडो गाड्यांचा ताफा, हातात झेंडे आणि घोषणाबाजी करत आंदोलक आझाद मैदानावर दाखल होताच संपूर्ण परिसर मराठा आरक्षणाच्या घोषणांनी दुमदुमून गेला. मैदान गच्च भरलं असून, संध्याकाळपर्यंत आंदोलनाची परवानगी मिळाली आहे.

आझाद मैदानावर पोहोचताच मनोज जरांगेंनी आंदोलनकर्त्यांना संबोधित केलं. त्यांनी सर्वप्रथम शिस्त आणि शांतता पाळण्याचं आवाहन केलं. “हिंसा करून आंदोलनाला बट्टा लावायचा नाही. मी प्राण द्यायला तयार आहे, पण समाजाची प्रतिमा खराब होऊ देणार नाही”, असे ठाम शब्द त्यांनी उच्चारले. जाळपोळ, दगडफेक किंवा अवाजवी गोंधळ होणार नाही, याची जबाबदारी प्रत्येक आंदोलनकऱ्याची आहे, असं त्यांनी सांगितलं.

जरांगेंनी स्पष्ट केलं की या लढ्यात विजयाशिवाय मागे हटणार नाही. “डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय कोणीही इथून हलणार नाही. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत झगडू”, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या वेळी त्यांनी सरकारशी सहकार्य राखण्याचा संदेशही दिला. “सरकारनं काही प्रमाणात सहकार्य दाखवलं आहे. आपणही शांततेत आणि शिस्तीत आंदोलन करावं. समाजाचं नाव खाली जाऊ नये”, असं त्यांनी स्पष्ट केलं.

दारू आणि गोंधळामुळे आंदोलनाची प्रतिमा मलिन होईल, याची जाणीव करून देत जरांगेंनी आंदोलकांना आवाहन केलं. “दारू पिऊन धिंगाणा घालू नका. त्यामुळे आपल्या लेकरांना भविष्यात मान खाली घालावी लागेल”, असं त्यांनी बजावलं. त्याचबरोबर, “मला गोळ्या लागल्या तरी चालतील, पण मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मागे हटणार नाही”, अशा शब्दांत त्यांनी आपला निर्धार पुन्हा अधोरेखित केला.

आंदोलनाचा राजकीय गैरवापर होऊ नये, याबाबत त्यांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला. “कोण राजकीय पोळी भाजतंय का, हे पाहा. समाजाच्या प्रश्नासाठी कुणालाही स्वार्थ साधू देऊ नका”, असा इशारा त्यांनी दिला. त्याचबरोबर पोलिसांशी सहकार्य करण्याचंही आवाहन केलं. “दोन तासांत मुंबई मोकळी करा. पोलिसांना कुणी त्रास देऊ नका. एकाही पोलीस अधिकाऱ्याला नाराज होऊ देऊ नका”, असं त्यांनी स्पष्ट केलं.

शेवटी जरांगेंनी आपल्या समाजाशी असलेली बांधिलकी अधोरेखित केली. “माझा शब्द खाली पडू देऊ नका, मीही तुमच्यासाठी दिलेला शब्द मोडणार नाही. मनोज जरांगे हटणार नाही. गरज पडली तर इथेच उपोषण करत प्राण देईन. पण मराठ्यांच्या अंगावर गुलाल टाकल्याशिवाय हा लढा थांबणार नाही”, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. त्यांच्या या दहा गर्जनांमुळे आंदोलकांमध्ये उत्साह संचारला असून, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आझाद मैदानावर खिळलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com