Mamata Banerjee : 'मी तोंड उघडले तर देश हादरेल', ममता बॅनर्जींचा इशारा

Mamata Banerjee : 'मी तोंड उघडले तर देश हादरेल', ममता बॅनर्जींचा इशारा

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या आयटी सेल प्रमुखांशी संबंधित ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापे टाकल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या आयटी सेल प्रमुखांशी संबंधित ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापे टाकल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईविरोधात मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी तीव्र प्रतिक्रिया देत थेट रस्त्यावर उतरून कोलकात्यात भव्य मोर्चा काढला. ईडी आणि भाजपवर गंभीर आरोप करत ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ईडीने ‘आय-पीएसी’ (I-PAC) या राजकीय सल्लागार संस्थेच्या कार्यालयावर छापे मारले. ही संस्था 2021 पासून तृणमूल काँग्रेससोबत काम करत आहे. “ही कारवाई केवळ चौकशीसाठी नसून, आमच्या पक्षाची माहिती, रणनीती आणि डेटा चोरण्याचा प्रयत्न आहे,” असा आरोप त्यांनी केला. भाजपने आधी निवडणूक आयोगाच्या मदतीने जनादेश चोरला आणि आता तीच पद्धत बंगालमध्ये राबवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावाही त्यांनी केला.

कोलकात्यात काढलेल्या मोर्चादरम्यान ममता बॅनर्जी अधिकच आक्रमक झाल्या. त्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आरोप करत, “कोळसा घोटाळ्याचे पैसे दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना देण्यात आले. अमित शहा यांच्या विरोधात माझ्याकडे पेन ड्राइव्ह आहे. गरज पडल्यास मी तो जनतेसमोर सादर करेन,” असा दावा केला. “मी तोंड उघडले तर संपूर्ण देश हादरून जाईल,” असेही त्या म्हणाल्या.

ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांच्यावरही गंभीर आरोप केले. “कोळसा घोटाळ्याचा पैसा शुभेंदू अधिकारी यांनी वापरला आणि तो अमित शहा यांच्यापर्यंत पोहोचवला,” असा आरोप त्यांनी केला. मात्र या आरोपांवर भाजपकडून तत्काळ प्रतिक्रिया येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आपली भूमिका स्पष्ट करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, “मी सहसा प्रतिक्रिया देत नाही. पण मला कोणी छेडल्यास मी सोडणार नाही.” ईडीच्या कारवाईला राजकीय सूडबुद्धीने प्रेरित असल्याचे सांगत त्यांनी केंद्र सरकारवर लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप केला. या घडामोडींमुळे पश्चिम बंगालमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, ईडीच्या कारवाईनंतर ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com