Women's World Cup : महिला विश्वचषक सामान्यात पाऊस पडला तर, ट्रॉफी नेमकी कुणाकडे?
थोडक्यात
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील महिला वनडे विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी खेळवण्यात येणार आहे.
हा नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर असेल.
या महत्त्वाच्या सामन्यावर पावसाचे संकट घोंगावत असून चाहत्यांची चिंता वाढली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील महिला वनडे विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. मात्र या महत्त्वाच्या सामन्यावर पावसाचे संकट घोंगावत असून चाहत्यांची चिंता वाढली आहे.
हवामान विभाग आणि एक्यु वेदरच्या ताज्या अंदाजानुसार रविवारी नवी मुंबईत दुपारी आणि संध्याकाळी वादळी पावसाची शक्यता आहे. दुपारी तीन वाजता, म्हणजेच सामन्याच्या सुरुवातीच्या वेळेस, सुमारे ६३ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर संध्याकाळी ४ ते ७ या वेळेत पावसाची शक्यता ५० टक्क्यांपर्यंत आहे. विशेष म्हणजे, सोमवारी राखीव दिवस ठेवण्यात आला असला तरी त्या दिवशीसुद्धा सुमारे ५५ टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सामना रविवारी किंवा राखीव दिवशीही पूर्ण न झाल्यास, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमानुसार भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित करण्यात येईल. त्यामुळे सामना धुवून गेल्यास दोन्ही संघांना विश्वचषक उचलण्याचा मान मिळेल.
भारतीय संघ पहिल्यांदाच महिला वनडे विश्वचषक जिंकण्यासाठी उत्सुक आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरसह स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स आणि दीप्ती शर्मा या खेळाडूंवर संघाच्या यशाची जबाबदारी आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा संघही दमदार फॉर्ममध्ये असून लॉरा वोल्वार्ड आणि मारिझान कॅप यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
दरम्यान, भारत आणि बांग्लादेश यांच्यात याच मैदानावर झालेला साखळी सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा हवामान निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. नवी मुंबईत पावसाचे सावट कायम राहिल्यास, चाहत्यांना संयुक्त विजेतेपदावरच समाधान मानावे लागणार आहे.

