Driving License Banned : सलग पाच वेळा नियम मोडले तर थेट लायसन्स जप्त; RTO चा मोठा बडगा

Driving License Banned : सलग पाच वेळा नियम मोडले तर थेट लायसन्स जप्त; RTO चा मोठा बडगा

रस्त्यावरील शिस्त आणि नागरिकांची सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने आता नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरोधात कडक पावले उचलली आहेत.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

रस्त्यावरील शिस्त आणि नागरिकांची सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने आता नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरोधात कडक पावले उचलली आहेत. नव्या सुधारित नियमानुसार, एका वर्षात सलग पाच किंवा त्याहून अधिक वेळा वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांचा Driving License थेट निलंबित किंवा रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे वारंवार नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांसाठी ही मोठी धोक्याची घंटा ठरली आहे.

या निर्णयानुसार, प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) आणि जिल्हा परिवहन अधिकारी (DTO) यांना लायसन्स निलंबन किंवा रद्द करण्याचे पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. १ जानेवारीपासून हे नियम लागू होणार असून, एका वर्षात पाच वाहतूक गुन्हे नोंदवले गेले तर चालकाचा परवाना धोक्यात येईल. महत्त्वाचे म्हणजे, यामध्ये केवळ अपघातास कारणीभूत ठरणारे गंभीर गुन्हेच नव्हे, तर हेल्मेट न घालणे, सीट बेल्ट न लावणे, सिग्नल तोडणे, वेगमर्यादा ओलांडणे, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे आणि ओव्हरलोडिंग यांसारख्या ‘दैनंदिन’ चुकांचाही समावेश आहे.

नव्या नियमावलीत पारदर्शकतेवर भर देण्यात आला आहे. परवाना रद्द किंवा निलंबित करण्यापूर्वी संबंधित चालकाला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाईल. नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. मात्र, एकदा पाच गुन्ह्यांची मर्यादा ओलांडली की चालकासाठी पुढील प्रवास खडतर ठरणार, हे निश्चित आहे. दिलासादायक बाब म्हणजे, ही मोजणी दरवर्षी नव्याने केली जाणार असून मागील वर्षातील गुन्हे पुढील वर्षात धरले जाणार नाहीत.

या निर्णयावर तज्ज्ञांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींच्या मते, रस्त्यांवरील बेफिकीर वाहनचालकांवर लगाम घालण्यासाठी हा निर्णय अत्यंत आवश्यक आहे. तर काही तज्ज्ञांचा सवाल असा आहे की, रस्त्यांची दुरवस्था, अपुरी वाहतूक चिन्हे आणि नियोजनातील त्रुटी दुरुस्त न करता केवळ चालकांवर कारवाई करणे कितपत योग्य आहे? तथापि, सर्वसामान्य वाहनचालकांसाठी हा स्पष्ट इशारा आहे—नियम पाळा, सावध रहा. अन्यथा “काय राव…” म्हणत नियम मोडत राहिलात, तर तुमची गाडी रस्त्यावर राहील, पण Driving License थेट RTO च्या कपाटात बंद होईल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com