Ajit Pawar : ‘काळाचं बोलावणं आलं तर जावं लागतं’, अजित पवारांचे चार दिवसांपूर्वी मृत्यूवर भाष्य...

Ajit Pawar : ‘काळाचं बोलावणं आलं तर जावं लागतं’, अजित पवारांचे चार दिवसांपूर्वी मृत्यूवर भाष्य...

महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणारी, मन सुन्न करणारी घटना आज घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणारी, मन सुन्न करणारी घटना आज घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुंबईहून बारामतीकडे निघालेलं त्यांचं खासगी विमान बारामती विमानतळावर उतरत असताना नियंत्रण सुटून धावपट्टीजवळ जमिनीवर आदळलं. या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

या दुर्घटनेला अधिकच भावनिक कडू-गोड किनार आहे. कारण अवघ्या चार दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी एका कार्यक्रमात आयुष्य, काळ आणि मरण यावर भाष्य केलं होतं. “काळाचं बोलावणं आलं तर जावं लागतं. तुम्ही-आम्ही आज असू, उद्या नसू. काळाचं नितीचं बोलावणं आल्यानंतर प्रत्येकाला जायचंच आहे,” असे शब्द त्यांनी उच्चारले होते. आज तीच वाक्यं आठवून लाखो कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिकांचे डोळे पाणावले आहेत. त्यांच्या त्या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, प्रत्येकाचं मन हेलावून टाकत आहे.

त्या भाषणात अजित पवार यांनी राजकारणापलीकडचा विचार मांडला होता. “राजकारण हेच सर्वस्व नाही. निवडणुका झाल्या की राजकारण विसरलं पाहिजे. ज्या कामातून त्या भागात आर्थिक सुबत्ता येईल, ते काम महत्त्वाचं आहे,” असं सांगत त्यांनी विकासाला प्राधान्य देण्याचा संदेश दिला होता. आज त्यांच्या निधनानंतर तोच संदेश अनेकांच्या ओठांवर आहे.

अजित पवार यांच्या निधनाचं वृत्त कळताच बारामतीमध्ये प्रचंड शोककळा पसरली. सकाळपासूनच त्यांच्या निवासस्थानाबाहेर आणि परिसरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली आहे. “अजितदादा आपल्यात नाहीत” हे सत्य स्वीकारणं अनेकांना कठीण जात आहे. कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत अश्रू, चेहऱ्यावर शून्य भाव दिसत आहेत. विविध पक्षांचे नेते, मंत्री, आमदार बारामतीत दाखल होत असून, अनेकांनी अश्रूंनी श्रद्धांजली वाहिली आहे. दिर्घ राजकीय कारकिर्द, आक्रमक निर्णयशैली आणि विकासाभिमुख नेतृत्वासाठी ओळखले जाणारे अजित पवार आज काळाच्या पडद्याआड गेले. मात्र त्यांच्या शब्दांनी, कामाने आणि आठवणींनी ते कायम महाराष्ट्राच्या स्मरणात राहणार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com